बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 20:50 IST2025-04-23T20:35:01+5:302025-04-23T20:50:00+5:30
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह भारतात असताना पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली.

बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. पहलगामध्ये आलेल्या १५ राज्यातील पर्यटकांची दहशतवाद्यांनी ओळख पटवून निर्घृणपणे हत्या केली. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांनाच लक्ष्य केले. देशातील प्रत्येक नागरिक संतप्त आहे आणि या दहशतवादी घटनेचा बदला घेण्याची वाट पाहत आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह भारत दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे. जेडी व्हान्स यांनीही या हल्ल्यानंतर शोक व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २५ वर्षांपूर्वीही अमेरिकेच्या प्रमुखांचा भारत दौरा सुरु होण्यापूर्वीच काश्मीरमध्ये ३६ लोकांची हत्या करण्यात आली होती.
पहलगाममध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक लष्करी अधिकारी आहेत तर एक आयबी अधिकारी आहे. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारताच्या दौऱ्यावर होते तर पंतप्रधान मोदी सौदीच्या दौऱ्यावर होते. महत्त्वाची बाब म्हणजे २००० मध्ये, जेव्हा तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर येणार होते, त्यावेळीही दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये असाच एक हल्ला केला होता.
२००० मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर येणार होते. त्यांचा हा दौरा २१ ते २५ मार्च २००० दरम्यान होणार होता. मात्र ते भारतात येण्याच्या काही तास आधीच जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एका गावात एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यानी ३६ शिखांना रांगेत उभे करून गोळ्या घालून ठार केले होते. हल्लेखोरांनी गावातील पुरूषांना गुरुद्वारासमोर रांगेत उभे करुन संपवले होते.
कसा झाला हल्ला?
२० मार्च रोजी संध्याकाळी अनंतनाग जिल्ह्यातील चित्तीसिंगपुरा या दुर्गम गावात सशस्त्र दहशतवाद्यांच्या एका गटाने हल्ला केला होता. तिथेही दहशतवाद्यांनी पहलगामच्या हल्लेखोरांसारखे भारतीय सैन्याचे गणवेश घातले होते. २० मार्चला संध्याकाळी ७:२० वाजता दहशतवाद्यांचा एक गट शीख गावात घुसला. मुख्य डोंगराळ रस्ते टाळून आणि अंधाराच्या आडून सफरचंदाच्या बागा आणि भाताच्या शेतातून दहशतवादी गावात घुसले होते. दहशतवादी गावात घुसले तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर, गावकऱ्यांनी कंदील पेटवले आणि रेडिओवर बिल क्लिंटन यांच्या भारत भेटीच्या बातम्या ऐकण्यास सुरुवात केली. दहशतवादी गावातल्या वेगवेगळ्या भागात गेले आणि शिखांना त्यांच्या घरातून, दुकानांमधून बाहेर काढलं आणि रस्त्यावर रांगेत उभे केले. त्यानंतर त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात ३६ लोक ठार झाले होते.
दरम्यान, पहलगाममध्येही मंगळवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास पोलिसांच्या गणवेशात चार ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. याहल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घालण्यापूर्वी कलमा म्हणण्यास सांगितले आणि ज्यांनी नाही म्हटलं त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.