पैसे काढण्यावर मर्यादा कायम
By admin | Published: January 8, 2017 01:13 AM2017-01-08T01:13:34+5:302017-01-08T01:13:52+5:30
दोन महिने उलटले : बँकांमधील गर्दीत घट
नाशिक : केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिने उलटूनही एकीकडे रिझर्व्ह बँकेने विविध खात्यांवरून पैसे काढण्यावरील मर्यादा अद्यापही उठवलेल्या नसताना दुसरीकडे शहरातील विविध बँकांच्या एटीएमचे शटर खालीच असून, अशा एटीएममधून नोटाबंदीच्या निर्णयानंतर एकदाही पैसे मिळालेले नाहीत.
शहरातील विविध भागातील एटीएम बंद असले तरी बहुतेक बँकांमध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिक तथा बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्या जवळील रोख रकमेचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार पैसे देण्यात अडचणी येत नसल्याने नोकरदार वर्गाचे वेतन खात्यावर जमा झालेले असतानाही बँकांमध्ये गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे ग्राहकांना व व्यापाऱ्यांना बँकांमधून गरजेनुसार पैसे मिळत नसले तरी शहरातील विविध बाजारपेठांमधील व्यवहारांमध्ये सुधारणा होत असून, विविध व्यवहारांंमधील रोखतेचे प्रमाण घटले आहे. सरकारने दावा केल्याप्रमाणे विविध व्यवहार कॅशलेस झाले नसले तरी बाजार पेठेतील व्यवहार लेसकॅश झाले आहेत. ग्राहकांनी गरजेनुसार रोख स्वरूपात पैसे खर्च करण्यास प्राधान्य दिले आहे. तर शक्य असलेल्या व्यवहारांमध्ये कॅशलेस पर्याय अवलंबण्यास प्राधान्य दिल्याने बाजारात गरजेपेक्षा रोकड कमी असली तरी व्यवहार सुरळीतरीत्या होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)