रेंगाळणारी वाहतूक; करोडोंचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:00 AM2018-04-27T01:00:05+5:302018-04-27T01:00:05+5:30
दरवर्षी अर्थव्यवस्थेचे १.४७ लाख कोटींचे नुकसान
नवी दिल्ली : गर्दीच्या काळात रेंगाळणाऱ्या वाहतुकीमुळे देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या चार महानगरांच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी १.४७ लाख कोटी रुपयांचा फटका बसतो, असे आढळून आले आहे.
एका संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महानगरांत वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक रेंगाळते. त्यामुळे वाहनांना प्रवासासाठी नियमित वेळेपेक्षा सरासरी दीड तास अधिक लागतो. जानेवारीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, वाहनांच्या गर्दीचा सर्वाधिक फटका कोलकाता शहराला बसतो. दिल्लीत सर्वाधिक नोंदणीकृत वाहने (१ कोटींपेक्षा जास्त) असली तरी रस्त्यांचे जाळे चांगले असल्याने कमी फटका बसतो. दिल्लीच्या क्षेत्रफळापैकी १२ टक्के क्षेत्रफळ रस्त्यांनी व्यापले आहे. कोलकात्यातील रस्त्यांचे क्षेत्रफळ अवघे ६ टक्के आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक शहरातील ३०० जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. दिल्लीत सर्वाधिक ४५ टक्के लोक खासगी कारचा वापर करतात. बंगळुरूमध्ये हे प्रमाण ३८ टक्के आहे.
रस्त्यांचा गैरवापर
नागरी वाहतूक तज्ज्ञ एन. रंगनाथन यांनी सांगितले की, कोलकात्यात रस्त्यांचे कमी प्रमाण, निकृष्ट भूमितीय स्थिती आणि शहराच्या गाभ्याच्या भागात वाहतुकीची मोठी गर्दी या कारणांनी वाहतूक रेंगाळते. बंगळुरूत रस्त्यांचा गैरवापर वाढला आहे.