भाषिक राजकारण करणाऱ्यांना दुकाने बंद करावी लागतील; पंतप्रधान मोदींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 08:37 AM2023-07-30T08:37:00+5:302023-07-30T08:37:40+5:30
"विकसित देशांची स्थानिक भाषेमुळेच प्रगती"
नवी दिल्ली : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) माध्यमातून देशातील प्रत्येक भाषेला योग्य सन्मान व श्रेय दिले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. स्वार्थासाठी भाषांचे राजकारण करणाऱ्या लोकांना आपली दुकाने बंद करावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. ‘एनईपी’ला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या क्षमतांऐवजी भाषेच्या आधारावर करणे हा सर्वांत मोठा अन्याय आहे. जगातील अनेक विकसित देशांना त्यांच्या स्थानिक भाषांमुळेच गती मिळाली आहे. युरोपातील बहुतांश देश आपल्या मूळ भाषेचा वापर करतात. भारतात मात्र स्थानिक भाषांना मागासलेपणाची निशाणी म्हणूनच सादर केले जाते. जे लोक इंग्रजी बोलू शकत नाही, त्यांची उपेक्षा केली जाते. त्यांच्या प्रतिभेला मान्यता दिली जात नाही. याचा ग्रामीण भागातील मुलांना सर्वाधिक फटका बसतो. एनपीए आणल्यानंतर देशाने आता या धारणेचा त्याग करण्यास सुरुवात केली आहे. मी संयुक्त राष्ट्रांतही भारतीय भाषेतच बोलतो. सामाजिकशास्त्रांपासून अभियांत्रिकीपर्यंत सगळे विषय भारतीय भाषांत शिकविले जातील. विद्यार्थ्यास जेव्हा आपल्या भाषेबाबत आत्मविश्वास असतो, तेव्हा त्याचे कौशल्य आणि गुणवत्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय आविष्कृत होते.
या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते ‘पीएम श्री’ योजनेच्या निधीचा पहिला हप्ता जारी करण्यात आला. देशातील १२ भाषांतील पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन मोदी यांनी केले. ‘अखिल भारतीय शिक्षण समागम’ प्रगती मैदानावरील ‘भारत मंडपम’मध्ये होत आहे.
टांझानिया, अबुधाबीत आयआयटी!
- मोदी यांनी सांगितले की, जग भारताकडे नव्या शक्यतांची नर्सरी म्हणून पाहत आहे. अनेक देश आपल्या येथे आयआयटी कॅम्पस सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क करीत आहेत. टांझानिया आणि अबुधाबी येथे प्रत्येकी एक आयआयटी कॅम्पस सुरूही करण्यात येत आहे. अनेक जागतिक विद्यापीठे भारतात आपले कॅम्पस सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क करीत आहेत.
- भारताला संशोधन व नवतेचे केंद्र बनविणे हे एनईपीचे लक्ष्य आहे. यात ज्ञानाची पारंपरिक व्यवस्था आणि भविष्यान्मुखी तंत्रज्ञान यांना समान महत्त्व दिले आहे.
- मातृभाषेतील शिक्षण भारतात विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळविण्यासाठी एका नव्या स्वरुपाची सुरूवात करीत आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने हे खूप महत्त्वपूर्ण पाउल असल्याचे माेदी म्हणाले.
पंतप्रधानांनी विचारले, मोदीजींना ओळखता का?
‘अखिल भारतीय शिक्षण समागम’चे उद्घाटन करण्याआधी मोदी यांनी तेथील एका प्रदर्शनाला भेट दिली. तेथे उपस्थित असलेली मुले मोदींना पाहून खूश झाली. मुलांनी त्यांना ‘नमस्ते’ म्हटले. त्यावेळी पंतप्रधानांनी मुलांना विचारले की, ‘तुम्ही मोदीजींना ओळखता का?’ त्यावर मुले म्हणाली, ‘हो, आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहिले आहे.’ मोदी यांनी मुलांसोबतचा एक व्हिडीओही ट्वीट केला. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘निरागस मुलांसोबचे आनंदाचे काही क्षण! त्यांची ऊर्जा आणि उत्साहामुळे मन आनंदाने भरून जाते.’