अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओची लिंक द्या; पोलिसांनी मेटाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:14 AM2023-11-12T09:14:41+5:302023-11-12T09:19:21+5:30
दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकांचीही माहिती मागवली आहे.
नवी दिल्ली : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर करणाऱ्या खात्याचा ‘युआरएल’ मिळविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया कंपनी मेटाला पत्र पाठवले आहे. या घटनेच्या संदर्भात एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकांचीही माहिती मागवली आहे.
ज्या खात्यातून व्हिडीओ तयार करण्यात आला होता त्या खात्याच्या युआरएल मिळवण्यासाठी आम्ही मेटाला पत्र लिहिले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी विविध कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे. “या प्रकरणाच्या तपासासाठी अधिकाऱ्यांची एक समर्पित टीम तयार करण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे की याची तड लागेल,” असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
‘तो’ मूळ व्हिडीओ कुठून आला?
दिल्ली महिला आयोगानेही या कृत्यात सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मूळ व्हिडिओ एका ब्रिटिश-भारतीय ‘सोशल मीडिया इन्फ्लुएंसर’चा असल्याचे म्हटले जात आहे.