मद्य धोरण घोटाळा प्रकरण: अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली; कोर्टाकडून दिलासा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 05:35 AM2024-03-16T05:35:33+5:302024-03-16T05:36:15+5:30
अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावताना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहावे, असे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यावरून ईडीने दाखल केलेल्या तक्रारप्रकरणी स्थगितीची मागणी करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊज ॲव्हेन्यूच्या सत्र न्यायालयाने दिलासा दिला नाही. केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावताना त्यांनी शनिवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहावे, असे आदेश दिले आहेत.
ईडीने केलेल्या याचिकेवर न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी त्यांना १६ मार्च रोजी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसला केजरीवाल यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मद्य धोरण घोटाळ्यासंबंधात ईडीने आठ वेळा समन्स बजावूनही केजरीवाल यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळल्यामुळे ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सिसोदिया यांची याचिका फेटाळली
कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी जामीन याचिका फेटाळून लावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आप नेते मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.