साक्षीनं शोभा डेंना अर्पण केलं ऑलिंपिक पदक

By Admin | Published: August 18, 2016 02:16 PM2016-08-18T14:16:59+5:302016-08-18T14:16:59+5:30

साक्षी मलिकने कुस्तीमध्ये मिळवलेलं ऑलिंपिकचं ब्रॉन्झ मेडल लेखिका शोभा डे ना अर्पण केलं आहे.

Literary Shona Dena offered Olympic medal | साक्षीनं शोभा डेंना अर्पण केलं ऑलिंपिक पदक

साक्षीनं शोभा डेंना अर्पण केलं ऑलिंपिक पदक

googlenewsNext
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
 
साक्षी मलिकने कुस्तीमध्ये मिळवलेलं ऑलिंपिकचं ब्रॉन्झ मेडल लेखिका शोभा डे ना अर्पण केलं आहे. पत्रकार परिषदेत तिनं ही धक्कादायक घोषणा केली आणि पत्रकारांना तर क्षणभर काय विचारावं हेच सुचेनासं झालं. मात्र, ऑलिंपिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेल्या साक्षीनं शोभा डेच नव्हे तर भल्या भल्याना शाब्दिक बाणांनी लोळवलं आणि पैलवान असले तरी भेजा पण तेज आहे असाच संदेश दिला. या पत्रकार परिषदेची ही झलक...
 
पत्रकार - तुम्ही शोभा डेंना पदक का अर्पण करताय? त्यांनी तर हा पैशाचा अपव्यय असून खेळाडू सेल्फी घ्यायला जातात अशी टीका केली होती. तुम्ही त्यांच्यावर राग तर नाही ना काढत आहात?
 
साक्षी - छे.. छे.. मी त्यांच्यावर अजिबात रागावलेली नाहीये. तुम्हाला माहित्येय ना आपण भारतीय खूप भावनाप्रधान असतो. प्रोफेशनल खेळाडू असा जरी शिक्का बसलेला असला, तरी आपण सगळे भावनेशी ईमान राखतो. त्यामुळे मग पाकिस्तानला हरवल्यावर युद्ध जिंकल्यासारखं वाटतं. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये तर आपण बघितलं, कप हरल्यापेक्षा पाकिस्तानविरोधात जिंकल्याचा आनंद आपल्याला खूप झाला होता.
 
पत्रकार - याचा इथे काय संबंध?
 
साक्षी - संबंध आहे ना... शोभा डेंच्या वक्तव्यामुळे मला प्रेरणा मिळाली. प्रतिस्पर्धी समोर आला की मला सारखं, तिच्या तोंडातून ऐकायला यायचं, पैसे वर आलेत का?  चल सेल्फी काढुया का? आणि तिच्यावर मग त्वेषानं हमला करायचे आणि असं करत करत मी पदक जिंकलं. जर शोभा डे असं बोलल्या नसत्या तर मला कुठेतरी प्रेरणा कमी पडली असती असं वाटतंय. म्हणून मी मेडल त्यांनाच अर्पण केलंय.
 
 
पत्रकार - तुम्ही देशवासियांना काय संदेश द्याल?
 
साक्षी - देशाला संदेश देण्याएवढी मी महान नाहीये. पण मी एक नक्की विनंती करेन, की तोंड उघडताना आपण काय करतो आणि कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान ठेवा. म्हणजे असं आहे की, समजा तुम्ही लेखिका आहात, तर तुम्ही लिहित असताना मनासारखं नाही झालं, तर परत लिहू शकता. अनेकवेळा लिहू शकता. मनासारखं होईपर्यंत छापणार नाही असं ठरवू शकता.
दुर्देवानं ही सवलत खेळाडूला नसते. यही मुकदमा, यही फैसला असा मामला असतो. एकदा रिंगमध्ये उतरलं की तुम्ही एकतर जिंकून बाहेर येता किंवा हरून. त्यामुळे तुमच्या कम्प्युटरमध्ये undo करायची जी सोय असते, ती आम्हाला नसते, याचा विचार जरूर करा.
 
पत्रकार - एका सिनेअभिनेत्याने पैलवानाची भूमिका केली आणि शुटिंगमधला अनुभव सांगताना झालेल्या कष्टांची तुलना रेप वुमनशी केली. याबद्दल काय सांगाल?
 
साक्षी - खरं सांगू का? मी सिनेमाही बघत नाही आणि हीरो हिरोईनच्या मुलाखतीही. हीरो हिरोईन, नी दिग्दर्शक येतात मोठ्या खेळाडूंना बघायला, त्यांच्यावर सिनेमा बनवायला, त्यांच्याकडून सिनेमा बनवण्यासाठी माहिती घ्यायला. एका सिनेमासाठी ते कष्ट घेत असतील काही महिने, अनेक टेक रिटेक घेऊन... पण आम्ही तर 15- 15 वर्ष मेहनत घेत असतो, या अशा एका पदकासाठी. त्यामुळे सिनेमावाल्यांपैकी कुणाच्याही वक्तव्यावर काही न बोललेलंच बरं.
इतकंच नाही तर...भारतामधल्या युवा खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे, जोपर्यंत खेळत आहात तोपर्यंत, खेळावरचे सिनेमे बघू नका. ते त्यांच्यासाठी असतात, ज्यांना खेळता येत नाही. ज्यांना खेळता येतं, त्यांनी फक्त खेळाचा सराव करावा, तेच आपलं काम आहे. सिनेमेवाल्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपलं काम करूया.
 
पत्रकार - भारतामध्ये खेळांवर सरकार तितका खर्च करत नाही त्यामुळे चांगले खेळाडू होत नाहीत, पदकं मिळत नाहीत असं म्हटलं जातं. एका नेमबाजानंही असंच मत व्यक्त केलंय. तुम्हाला काय वाटतं?
 
साक्षी - हे बघा, सगळ्या गोष्टींचं खापर सरकारवर फोडून काय फायदा? खेळांवर खर्च होणारा पैसा बघितला, तर खरा किती खर्च होतो? नी मध्ये किती हडप होतो? हे तरी माहित्येय का? वशिल्याच्या खेळाडुंना घुसवणारे आणि दर्जेदार खेळाडुंवर अन्याय करणारे पदाधिकारी काय राजकारणी असतात का?
देशामधला सर्वसामान्य माणूस जितका भ्रष्ट असेल तितकंच भ्रष्ट इथलं सरकार असेल. त्यामुळे मला वाटतं की अशा बाबींवर खेळाडूने जास्त विचार करू नये. त्यानं जे उपलब्ध आहे त्याच्या सहाय्यानं दिवसरात्र मेहनत करून उत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करावा.
 
पत्रकार - हे विचार फार आदर्श वाटत नाहीत का? किती जणं असा विचार करू शकणार?
 
साक्षी - आम्हाला अगदी सुरूवातीला एक शिकवलं जातं. फोकस करायला. लक्ष केंद्रीत करायला, मन एकाग्रचित्त करायला. याचा अर्थ असतो, आजुबाजुला कितीही विचलित करणाऱ्या गोष्टी असल्या तरीही ध्येयावरून, लक्ष्यावरून चित्त ढळता कामा नये. अब्ज लोकांचं दडपण बाजुला ठेवून केवळ पुढच्या चेंडूवर लक्ष केंद्रीत करू शकतो, तो सचिन तेंडुलकर होतो.
त्यामुळं हे आदर्श वाटत असलं तरी, ते खेळाडूसाठी आवश्यक आहे. बरं तुम्हाला, राजकारणी, सेलिब्रिटी, विचारवंत, वरीष्ठ, ज्येष्ठ, कुटुंब, टीकाकार, इत्यादींचा विचार खेळ सोडून करायचा असेल तर पत्रकार व्हा, खेळाडू कशाला होता?

Web Title: Literary Shona Dena offered Olympic medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.