कर्नाटक चिंतेत! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:27 PM2021-11-29T21:27:23+5:302021-11-29T21:28:11+5:30
Omicron Coronavirus Variant : मंत्री डॉ के सुधाकर म्हणाले, "गेल्या 14 दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व लोकांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही शनिवारपासून त्यांचे प्राथमिक आणि दुय्यम संपर्क शोधणे आणि ट्रेस करणे सुरू केले आहे."
बंगळुरु : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनबाबत (Omicron Variant) जगभरात चिंता वाढली आहे. यातच दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कर्नाटक राज्य सरकारचीच नव्हे तर देशाची झोप उडाली आहे.
दरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर (Karnataka Health Minister Dr K Sudhakar) यांनी सोमवारी सांगितले की, नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूला आलेल्या दोन लोकांपैकी एकाचे सॅम्पल हे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगळे आहेत. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगू शकत नाही, कारण सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अधिकाऱ्यांच्या संपर्क करत आहोत, असे डॉ के सुधाकर म्हणाले.
डॉ के सुधाकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "गेल्या नऊ महिन्यांपासून केवळ डेल्टा व्हेरिएंटचीच प्रकरणे समोर आली आहेत, पण तुम्ही म्हणत आहात की, एक सॅम्पल ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आहे. याबद्दल मी अधिकृतपणे सांगू शकत नाही. मी आयसीएमआर आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच, सॅम्पल आयसीएमआरकडे पाठवण्यात आले आहेत."
व्यक्तीची ओळख सांगण्यास नकार देताना मंत्री डॉ के सुधाकर म्हणाले की, त्यांच्या कोरोना अहवालावरून असे दिसून आले आहे की, त्यांना कोरोना व्हायरसच्या एका वेगळ्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. मंत्री म्हणाले, "एक 63 वर्षांचा माणूस आहे, ज्याचे नाव मी सांगू नये. त्याचा अहवाल जरा वेगळा आहे. तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगळा दिसतो. आम्ही ICMR अधिकार्यांशी चर्चा करू आणि ते काय आहे ते सांगू."
याचबरोबर, डॉ के सुधाकर यांनी सांगितले की, मंगळवारी आरोग्य विभागातील प्रमुख सचिवांपासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंतच्या डॉक्टरांसमवेत कोणती पावले उचलतील या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत कोविड-19 वरील तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यांनाही बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत सविस्तर अहवाल मागवला असल्याचेही डॉ के सुधाकर यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व लोकांवर लक्ष
मंत्री डॉ के सुधाकर म्हणाले, "गेल्या 14 दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व लोकांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही शनिवारपासून त्यांचे प्राथमिक आणि दुय्यम संपर्क शोधणे आणि ट्रेस करणे सुरू केले आहे." तसेच, ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल डॉ के सुधाकर यांनी दक्षिण आफ्रिकेत काम करणार्या आपल्या वर्गमित्र डॉक्टरांशी चर्चा आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, नवीन व्हेरिएंट डेल्टा व्हेरियंटइतका धोकादायक नाही. तसेच, डॉ के सुधाकर म्हणाले की, लोकांना अस्वस्थता, उलट्या होण्याचा त्रास होतो आणि कधी कधी नाडीचे प्रमाण वाढते, पण चव आणि वासाचा अनुभव कायम राहतो. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे कारण त्याची तीव्रता गंभीर नाही.