अमरनाथ मंदिरातील आरतीचे थेट प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:59 AM2020-07-06T04:59:55+5:302020-07-06T05:00:26+5:30
वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने श्री अमरनाथ मंदिर मंडळाने आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबत प्रसार भारतीला सांगितले होते.
जम्मू : वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने दूरदर्शन ५ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत अमरनाथ मंदिरात होणाऱ्या विशेष आरतीचे थेट प्रक्षेपण करणार आहे. भाविकांसाठी ही आनंदाची बातमी देताना प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी सांगितले की, श्री अमरनाथ मंदिर मंडळ प्रसार भारतीच्या सहयोगाने दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर श्री अमरनाथांच्या पवित्र गुहेतून आरतीचे थेट प्रक्षेपण करणार आहे. दूरदर्शनचे १५ सदस्यांचे पथक थेट प्रक्षेपणासाठी अमरनाथ मंदिर परिसरात तळ ठोकून आहे.
वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने श्री अमरनाथ मंदिर मंडळाने आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबत प्रसार भारतीला सांगितले होते. मुख्य कार्यालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर दूरदर्शनचे तांत्रिक पथक रवाना झाले आहे.
मंदिर प्रशासन कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन अल्पावधीसाठी वार्षिक यात्रा आयोजित करण्याची तयारी करीत आहे. सुरुवातीच्या प्रस्तावावर बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेनुसार वार्षिक यात्रा जुलैच्या तिसºया आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, सद्य:स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच यात्रेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.