Live - काँग्रेसचा दोन राज्यात पराभव, भाजप एका राज्यात विजयी
By Admin | Published: May 19, 2016 08:22 AM2016-05-19T08:22:36+5:302016-05-19T14:26:36+5:30
पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, निकालाचे चित्र आता ब-यापैकी स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, निकालाचे चित्र आता ब-यापैकी स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले आहे. २०११ च्या तुलनेत त्यांच्या पक्षाला २१० पेक्षा जास्त जागा मिळतील असे चित्र आहे. त्यांना रोखण्यासाठी डावे आणि काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र डाव्यांचा पार धुव्वा उडाला आहे. काँग्रेस आपल्या जागा कायम राखण्यात ब-यापैकी यशस्वी ठरली आहे.
ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये प्रथमच भाजपचे कमळ उमलणार आहे. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपला ७५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी आहे. काँग्रेसचे मागच्या पंधरावर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले आहे.
तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा अम्मा राज येताना दिसत आहे. तामिळनाडूत सत्तांतर होईल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलनी वर्तवला होता. मात्र इथे जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि द्रमुक आघाडीने मागच्यावेळपेक्षा यावेळी कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र सत्तेपासून ते दूर आहेत.
केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे डाव्याच्या एलडीएफ आघाडीने बाजी मारली आहे. १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीला ५० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे.
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यात भाजप सत्तेच्या शर्यतीत नसनूही भाजपने इथे जोरदार प्रचार केला होता. या राज्यांमध्ये पक्ष विस्तार भाजपचे उद्दिष्टय आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदर्शन निराशाजनक राहीले आहे.