LIVE : गुरमीत राम रहीमविरोधातील हत्याप्रकरणांची सुनावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 01:28 PM2017-09-16T13:28:14+5:302017-09-16T14:55:55+5:30
साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधातील आणखी दोन हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
चंदिगड, दि. 16 - साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधातील आणखी दोन हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. 50 वर्षीय गुरमीत राम रहीम सध्या रोहतक जेलमध्ये बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत आहे व हत्या प्रकरणातील सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये निमलष्करी सैनिकांच्या तुकड्या आणि हरियाणा पोलिसांचं पथकदेथील तैनात करण्यात आले आहे. साध्वी बलात्कारप्रकरणी बाबा राम रहीमला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. सीबीआय न्यायालय आता पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येविरोधात सुनावणी सुरू आहे. हत्येच्या गुन्ह्यांसाठी जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.
दरम्यान, वकील नवकिरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर खट्टा सिंह हत्या प्रकरणात जबाब देण्यास तयारी दर्शवली आहे. कोर्टासमोर जबाब देण्यास तो तयार झाला आहे. त्याचा जबाब घ्यायचा की नाही यावर 22 सप्टेंबरला कोर्ट निर्णय घेईल. नवकिरण हे खट्टा सिंहचे वकील आहेत. त्यांनी असेही सांगितले की, खट्टा सिंह यांनी घाबरुन आपला जबाब बदलला होता. यावर खट्टा सिंह असे म्हणाले की, मला भीती वाटत होती मला आणि माझ्या मुलालाही जीवे मारण्यात येईल.कारण आम्हाला तशी धमकी मिळाली होती.
गेल्या 14 वर्षांपासून ही प्रकरणं कोर्टात सुरू आहेत.
या प्रकरणांबाबत जाणून घेऊया माहिती -
पहिले प्रकरण - पत्रकाराची हत्या
सिरसातील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून अनेकदा डेरा सच्चा सौदामध्ये होत असलेले अन्याय आणि अत्याचाराबाबत वृत्त छापत होते. डेरामध्ये सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोटही सर्वप्रथम त्यांच्याच वृत्तापत्राद्वारे करण्यात आला होता.
त्यांच्या वृत्तपत्रानं एक अनामिक पत्रदेखील छापले होते. ज्यात सविस्तर माहिती देण्यात आली होती की, कशा प्रकारे सिरसा येथील डेराच्या मुख्यालयात महिलांवर अत्याचार केले जातात. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती आणि थेट राम रहीमवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. यानंतर ऑक्टोबर 2002मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासून ते आजपर्यंत रामचंद्र छत्रपती यांचा मुलगा वडिलांच्या मारेक-यांना शिक्षा व्हावी, यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे.
दुसरे प्रकरण - डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापकाची हत्या
दुसरे प्रकरण डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य रणजीत सिंह यांच्या हत्येशी संबंधित आहे. हे प्रकरण साध्वींवर झालेल्या बलात्कार प्रकरणाशी संबंधित आहे. रणजीत हा डेऱ्याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. तो राम रहीम यांच्या जवळचा असल्याने त्याला राम रहीम याचे सारे कारनामे माहीत होते. त्याची 10 जुलै 2003 मध्ये हत्या करण्यात आली होती. राम रहीम या प्रकरणातही आरोपी आहे. या दोन्ही हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम हा मुख्य सूत्रधाराच्या स्वरुपात सीबीआयनं म्हटले आहे. याप्रकरणी बाबा राम रहीमला शिक्षा व्हावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी कोर्टाकडे धाव घेतली. यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं नोव्हेंबर 2003 मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. हत्या प्रकरणात सीबीआयनं 30 जुलै 2007 रोजी आरोपपत्र दाखल केले होते.
जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा
हत्येच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामुळे या प्रकरणाच्या सुनावणी संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरमीत राम रहीम याला आज हत्येप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी त्याला सीबीआयच्या कोर्टात हजर करण्याची शक्यता कमी आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेलमध्येच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
I was scared that they would kill me and my son, we were threatened: Khatta Singh, witness in murder case against #RamRahimpic.twitter.com/B9OQ7oRcAK
— ANI (@ANI) September 16, 2017