घराणेशाहीमुळे 'लोजपा'मध्ये फूट; नाराज नेत्यांनी स्थापला नवीन पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 03:40 PM2019-06-13T15:40:54+5:302019-06-13T15:41:35+5:30
दरम्यान पक्षांतर करून आलेल्या लोकांना पक्षप्रमुखांकडून तिकीट देण्यात येत आहे. तसेच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी पक्षात पायघड्या टाकल्या जात आहेत. लोजपामध्ये केवळ कुटुंबियांना प्राधान्य देण्यात येते असा, आरोप देखील शर्मा यांनी केला.
नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात फूट पडली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून नवीन पक्ष स्थापन केला आहे. यामध्ये माजी खासदारापासून राष्ट्रीय महासचिव यांच्यासह पक्षाचे प्रवक्ते देखील सामील आहेत. लोक जनशक्ती पार्टीतील घराणेशाहीला कंटाळूनच नवीन पक्ष स्थापन केल्याचे बंडखोर नेत्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये सहा जागा जिंकणाऱ्या लोजपावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. लोजपाचे राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा म्हणाले होते की, वैशाली मतदार संघातील माजी खासदार रामा सिंह यांच्यासह नाराज असलेल्या अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देणार आहे. त्यानुसार अनेक नेत्यांनी राजीनामा देत नवीन पक्षाची स्थापना केली आहे. लोक जनशक्ती पार्टी धर्मनिरपेक्ष असं या पक्षाचं नाव आहे. यामध्ये सत्यानंद शर्मा देखील सामील आहेत.
लोजपा प्रमुख रामविलास पासवान यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सत्यानंद शर्मा यांच्यासह पक्षातील ११६ पदाधिकाऱ्यांनी लोजपाला रामराम ठोकला आहे. यावेळी सत्यानंद शर्मा यांनी रामविलास पासवान यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कौटुंबिक वाद आणि भ्रष्टाचार लोजपामध्ये वाढला असून पैसे घेऊन पक्षाकडून तिकीट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान पक्षांतर करून आलेल्या लोकांना पक्षप्रमुखांकडून तिकीट देण्यात येत आहे. तसेच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी पक्षात पायघड्या टाकल्या जात आहेत. लोजपामध्ये केवळ कुटुंबियांना प्राधान्य देण्यात येते असा, आरोप देखील शर्मा यांनी केला.