लोजपा अडचणीत; अनेक नेते देऊ शकतात सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:29 AM2021-04-11T05:29:51+5:302021-04-11T05:30:28+5:30
LJP : विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षात गेलेले भाजप नेते पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. प. बंगाल निवडणुकीनंतर भाजपचा दरवाजा खुला होऊ शकतो.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर लोजपासमोरील संकट कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत. लोजपा प्रमुख चिराग पासवान यांच्या कार्यशैलीवर बहुतांश नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षात फूट पडत आहे.
विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षात गेलेले भाजप नेते पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. प. बंगाल निवडणुकीनंतर भाजपचा दरवाजा खुला होऊ शकतो. लोजपाचे एकमेव आमदार राजकुमार सिंह हे जदयूत दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र सिंह, उषा विद्यार्थी, रामेश्वर चौरसिया व रवींद्र यादस यांच्यासह ६० पेक्षा अधिक नेत्यांनी पक्ष बदलला होता.
घरवापसी ?
यातील बहुतांश लोजपामध्ये गेले होते. या नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या या नेत्यांना पुन्हा सोबत घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यापूर्वीच लोजपाचे २०० पेक्षा अधिक नेते जदयूत सहभागी झाले आहेत. भाजप राज्यात आपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.