लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा; AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज, नेमके काय झाले होते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 18:55 IST2024-06-27T18:53:36+5:302024-06-27T18:55:54+5:30
Lal Krishna Advani Health Update: बुधवारी रात्री लालकृष्ण अडवाणी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा; AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज, नेमके काय झाले होते?
Lal Krishna Advani Health Update: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांच्यावर उपचार करण्यात आले. आता लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने एम्स रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली.
९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी सायंकाळी उशिरा अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना लगेचच तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. युरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, लालकृष्ण अडवाणी यांचे एक छोटे ऑपरेशन करण्यात आले. आता त्यांना बरे वाटत आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
२०१४ पासून लालकृष्ण अडवाणी सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती आणि तिसरा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वी त्यांचे शुभाशिर्वाद घेतले होते. तत्पूर्वी, लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.