LMOTY 2020 : कोरोना महासाथीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. लहाने यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 01:44 PM2021-03-16T13:44:07+5:302021-03-16T13:46:16+5:30
Dr. Tatyarao Lahane : डॉ. लहाने यांनी महासाथीच्या काळात महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा उपलब्ध केल्या होत्या. तसंच त्यांनी मृत्यूदर नियंत्रणात आणण्यातही मोलाची कामगिरी बजावली होती.
कोरोना महासाथीच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत डॉ. तात्याराव लहाने यांना 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड'नं सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सुरुवातीच्या काळात केवळ तीन प्रयोग शाळांमध्ये चाचण्या घेतल्या जात होत्या. परंतु आज राज्यात ५४६ प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी केली जाते. याचं संपूर्ण श्रेय डॉ. तात्याराव लहाने यांना जातं.
तात्याराव लहाने हे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तसंच सध्या कोरोनाच्या महासाथीत त्यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रांची व्यवस्था केली. त्यामुळे अनेक रुग्णांना कोरोनाचं निदान करण्यासाठी मदत झाली. या कालावधीत त्यांनी रुग्णांच्या मदतीसाठी तब्बल १० हजार ८९० डॉक्टर्सदेखील उपलब्ध केले.
का करण्यात आला सन्मान?
- एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या २९१७ डॉक्टरांची त्यांनी निरनिराळ्या कोरोना रुग्णालयांमध्ये सेवा मिळवून दिली. यासोबतच तिसरं वर्ष उत्तीर्ण केलेल्या सहा हजार परिचारिकांना त्यांनी या सेवेत घेतलं.
- कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिवीर, फेविपिरावीर, टोसिलिजुमॅबसारखी औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हतं. परंतु त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात ही औषधं केवळ उपलब्धच झाली नाही तर देशात त्यांची किंमतही सर्वात कमी होती.
- केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही डॉ. लहाने यांच्या अध्यक्षतेखाली आयुष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. याच्या माध्यमातून राज्यात ९५० इम्युनिटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले. मृत्यू दर कमी करण्यासाठी डॉ. लहाने यांनी दररोज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना मार्गदर्शन केलं.
- त्यांच्या या प्रयत्नांमुळे राज्यातील मृत्यूदरावर नियंत्रण मिळवता आलं. आरोग्य क्षेत्रातील डॉ. लहाने यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांना लोकमत समूहाद्वारे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आलं.