LMOTY 2020 : आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली, अरविंद केजरीवाल यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 09:18 PM2021-03-15T21:18:58+5:302021-03-15T21:20:04+5:30
LMOTY 2020 : अरविंद केजरीवाल यांनी गेली ६ वर्षे दिल्लीचे सरकार चालवताना केलेल्या सुधारणांचा आवर्जुन उल्लेख केला. तसेच दिल्लीमध्ये आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली, असे विधान केले.
नवी दिल्ली - लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२० (LMOTY 2020 ) सोहळा आज दिल्लीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याहस्ते झाले. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गेली ६ वर्षे दिल्लीचे सरकार चालवताना केलेल्या सुधारणांचा आवर्जुन उल्लेख केला. तसेच दिल्लीमध्ये आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली, असे विधान केले. (We have revolutionized education and health in Delhi, says Arvind Kejriwal)
दिल्ली सरकारने केलेल्या विशेष कामांचा उल्लेख करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारमधील आमच्या अर्थसंकल्पामधील २५ टक्के रक्कम ही शिक्षण क्षेत्रावर खर्च होते. तर १५ टक्के रक्कम ही आरोग्य क्षेत्रावर खर्च होते. असे अन्य कुठेही होत नाही. दिल्लीत आमच्या सरकारी शाळा ह्या खासगी शाळांना तोडीस तोड आहेत. आज आमच्या सरकारी शाळांमध्ये स्वीमिंग पूल आहेत. लिफ्ट आहेत. आमचे शिक्षक बाहेरील देशांमध्ये प्रशिक्षण घेऊन येत आहे. अशा प्रकारे दिल्लीमध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
दरम्यान, या देशाची ताकद मोठे लोक नसून छोटी माणसं आहेत, असे विधानही त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रातील लोकमतच्या कामाचा विशेष उल्लेख केला. लोकमतच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रच लोकमत आहे. लोकमत खूप चांगलं काम करत आहे. लोकमतकडून पुरस्कार मिळाल्यावर लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात. मी लोकमत आणि दर्डा कुटुंबाचे अभिनंदन करतो, असेही पुढे सांगितले.