रस्ते निर्मितीत विक्रम करणारे गडकरी स्वपक्षीय नेत्यामुळेच अडचणीत येतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:21 AM2021-08-10T06:21:33+5:302021-08-10T06:24:59+5:30
नितीन गडकरी म्हणाले, टोलवसुली ३.३ टक्क्यांनी वाढली
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी हे देशात महामार्ग बांधण्याबाबत विक्रम घडवीत असल्यामुळे चर्चेत असतात. मात्र, राज्यसभेत गडकरी त्यांच्याच पक्षाचे सदस्य सुशीलकुमार मोदी यांच्यामुळे अडचणीत आले.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व राज्यसभा सदस्य मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावरील (एनएचएआय) कर्ज मार्च २०२१ मध्ये ३.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले का, असे विचारले होते. मार्च २०१७ मध्ये हेच कर्ज ७३,३८५ कोटी रुपये होते. या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, हे कर्ज मार्च २०२० मध्ये २.४९ लाख कोटी होते, ते आता ३.०७ लाख कोटी रुपये झाले आहे. एनएचएआयकडील एकूण कर्ज मार्च २०१७ मध्ये ७४,७४२ कोटी होते, ते मार्च २०२१ मध्ये ३.०६,७०४ कोटी झाले आहे. २०१७ पासून एनएचएआयने बाहेरून तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
सुशीलकुमार मोदी म्हणाले की, एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ यादरम्यान टोलवसुली चार टक्क्यांनी वाढून सुमारे २६ हजार कोटी झाली का, यावर गडकरी टोलवसुली साधारणपणे ३.३ टक्के वाढली, असे म्हणाले.
रस्ते ही संपत्ती : एनएचएआय रस्ते ही बहुमूल्य संपत्ती निर्माण करीत आहे. २०१७ पासून प्राधिकरणने सार्वजनिक पैशांतून १७,०४२ कि.मी. रस्ते बांधले असून, सुमारे ४.०८ लाख काेटी रुपये खर्च झाला. सार्वजनिक पैशांतून बांधकाम झालेल्या रस्त्यांना टोल लावला आहे. २०१७ पासून एनएचएआयने ७४,३३७ कोटी रुपये कर्जफेड केली आहे, असेही गडकरी म्हणाले.