पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर अंजू कुठे गेली?; अचानक दिल्लीतून झाली गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:24 AM2023-12-01T11:24:18+5:302023-12-01T11:24:49+5:30
अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली.
फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न करण्यासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू आता भारतात परतली आहे. मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर तिचा ठावठिकाणा माहीत नाही. ती राजस्थानच्या भिवडी येथील तिच्या घरी गेली नाही किंवा ती आपल्या मुलांनाही भेटली नाही. अंजूच्या मुलांनीही तिला राजस्थानमध्ये भेटण्यास नकार दिला आहे. अंजू भारतात आल्यानंतर तिच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व वाहने आणि अनोळखी व्यक्तींची कसून तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.
इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या टीमने अंजूची 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलाचीही चौकशी केली. भिवडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) दीपक सैनी यांनी दिेलेल्या माहितीनुसार, अंजूच्या प्रकरणाचा तपास सुरू असून लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गरज पडल्यास अंजूची चौकशी केली जाऊ शकते आणि तिला अटकही केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.
अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली. अंजू दिल्लीत आल्यावर तिला पाकिस्तानात राहण्याबाबत विचारण्यात आले, मात्र तिने याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र ती मुलांना घेऊन पाकिस्तानात जाणार असल्याचे तिने याआधी सांगितलं आहे.
जेव्हा अरविंदला अंजूच्या पाकिस्तानातून परतण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे कोणतीही माहिती नाही आणि मला त्यासंबंधी काहीही बोलण्यात रस नाही. अरविंदच्या म्हणण्यानुसार, त्यांचा आणि अंजूचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. घटस्फोट होण्यासाठी तीन ते पाच महिने लागतात. अंजूला भारतात येण्यासाठी केवळ 1 महिन्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, तिला घटस्फोटानंतरच मुलांचा ताबा मिळू शकतो.