तीन टप्प्यांत देश होणार Unlock; जाणून घ्या काय असतील नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:23 AM2020-05-31T06:23:27+5:302020-05-31T06:23:56+5:30
या कालावधीत दररोज रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या हालचाली बंद करण्यात येतील.
नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आले असून यामध्ये तीन टप्प्यांत सूट देण्य़ात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे.
पहिला टप्पा : खालील व्यवहार ८ जूननंतर सुरू होतील-
१) धार्मिक स्थळे/पूजा स्थळे सर्वांसाठी खुली होतील.
२) हॉटेल्स, रेस्टॉरंटस् व इतर आदरातिथ्य सेवा.
३) शॉपिंग मॉल्स.
हे सर्व सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय काही मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. त्यासाठी केंद्राची मंत्रालये/विभाग व इतर संबंधितांशी चर्चा करण्यात येणार आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून कोरोना रोखण्यास प्राधान्य राहील.
दुसरा टप्पा : शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक /प्रशिक्षण/कोचिंग संस्था, राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर सुरू केली जातील. यासाठी राज्य सरकारे संस्था, पालक व इतर संबंधितांशी संपर्क साधून चर्चा करू शकतात. त्यांनी दिलेल्या माहितीवरून जुलैमध्ये या संस्था पुन्हा उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबत मंत्रालय मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. तेथेही फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरच कोरोना रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.
तिसरा टप्पा : स्थितीचा आढावा घेतल्यानंतर खालील व्यवहार सुरू करण्याच्या तारखा पुन्हा ठरविण्यात येणार आहेत.
१) आंतरराष्टÑीय हवाई प्रवासी वाहतूक. २) मेट्रो रेल्वे.
३) सिनेमा हॉल, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स, बार व आॅडिटोरियम, हॉल व तत्सम जागा.
४) सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/अकॅडेमिक/ सांस्कृतिक/धार्मिक समारंभ व इतर गर्दीचे समारंभ.
1. लॉकडाऊन ३० जूनपर्यंत फक्त कंटेन्मेंट झोनपुरता मर्यादित राहील.
2. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासन कंटेन्मेंट झोन निश्चित करील.
3. कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक घडामोडी चालू राहतील. या भागातून बाहेर जाण्यास व बाहेरून आत जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. यातून वैद्यकीय, जीवनावश्यक वस्तू व सेवांना सूट देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये प्रत्येक घरावर नजर असेल, कोण-कोणाच्या संपर्कात येत आहे, यावरही नजर असेल.
4. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर बफर झोन ठरविण्याचे अधिकारही राज्यांना देण्यात आले आहेत. जेथे नवीन रुग्ण वाढू शकतात, त्या भागांमध्ये आवश्यक ते निर्बंध घालण्यात येणार आहेत.
रात्रीची संचारबंदी : या कालावधीत दररोज रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या हालचाली बंद करण्यात येतील. जीवनावश्यक बाबींना यातून वगळण्यात आले आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने आदेश जारी करायचे आहेत, तसेच याची अंमलबजावणी कडकपणे करायची आहे.
व्यक्ती व मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत
1. व्यक्ती किंवा मालाची राज्यांतर्गत किंवा राज्याबाहेर वाहतूक करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी/मंजुरी/ई-परमिट घेण्याची गरज नाही.
2. तथापि, राज्य सरकारे सार्वजनिक आरोग्य व त्यांच्या आढाव्यानुसार, ही वाहतूक नियंत्रित करू शकतात. त्यासाठी त्यांनी त्या नियमांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्यावी.
3. पॅसेंजर ट्रेन, श्रमिक विशेष रेल्वे, देशांतर्गत प्रवासी हवाई वाहतूक, देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरिक व देशाबाहेर प्रवास करणारे विशेष व्यक्ती, परकीय नागरिकांची वाहतूक ही मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सुरू राहील.
4. कोणतेही राज्य कोणत्याही प्रकारच्या वस्तू व मालाची वाहतूक राज्यात व राज्याबाहेर रोखू शकणार नाही.
यांना घरीच
थांबण्याची सूचना
६५ वर्षांवरील व्यक्ती, आजारी, गर्भवती महिला, १० वर्षांखालील बालके यांना घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यंत गरजेच्या किंवा वैद्यकीय कारणासाठीच त्यांनी बाहेर पडावे, असेही म्हटले आहे.
मास्क : सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक आहे.
फिजिकल डिस्टन्सिंग : सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने इतरांपासून किमान ६ फुटांचे अंतर राखले पाहिजे. दुकानदाराने ग्राहकांसाठी हा नियम घालून द्यावा व एका वेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक असता कामा नये.
समारंभ : मोठ्या गर्दीचे समारंभ/कार्यक्रम यावरील बंदी कायम राहील. विवाहासाठी ५० पेक्षा अधिक लोकांना हजर राहण्याची परवानगी असणार नाही. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा अधिक लोकांना हजर राहण्याची परवानगी नाही.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू इत्यादीचे सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वर्क फ्रॉम होम : शक्यतो सर्वांनी वर्क फ्रॉम होम करावे.
स्क्रीनिंग व हायजिन : प्रवेश करतेवेळी व बाहेर जातेवेळी थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश व सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे.
वारंवार सॅनिटायझेशन : कामाच्या संपूर्ण ठिकाणी आणि जो भाग वारंवार सर्वांच्या संपर्कात येतो तिथे प्रत्येक शिफ्टच्या मध्ये सॅनिटायझेशन केले पाहिजे.
डिस्टन्सिंग : कामाच्या ठिकाणी सर्वांनी एकमेकांपासून डिस्टन्सिंग पाळले पाहिजे. विशेषत: दोन शिफ्टमधील वेळ, लंच ब्रेक आदी वेळी हे पाळले जावे.