Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 02:01 PM2020-05-29T14:01:05+5:302020-05-29T14:02:43+5:30
केंद्र सरकार आणि राज्यांची सरकारे कोरोनाच्या वाढत्या संक्रमनासह अर्थव्यव्यवस्थेबाबतही चिंतेत आहेत. यामुळे एकीकडे कोरोना तर दुसरीकडे गेले दोन महिने बंद असलेली अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे आव्हान आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशात दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन करण्य़ात आले होते. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण पाहत तीनवेळा लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. आता हा चौथा लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार असून कोरोनाच्या रुग्णांनी तर पाच हजाराचा आकडा पार केला आहे. यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यामध्ये गोव्य़ासह अनेक राज्यांनी आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली.
केंद्र सरकार आणि राज्यांची सरकारे कोरोनाच्या वाढत्या संक्रमनासह अर्थव्यव्यवस्थेबाबतही चिंतेत आहेत. यामुळे एकीकडे कोरोना तर दुसरीकडे गेले दोन महिने बंद असलेली अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे आव्हान आहे. यासंबंधी शहा यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यानंतर दुपारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या चर्चेचा तपशील मांडला.
राज्यांना लॉकडाऊन वाढवायचाही आहे आणि अर्थव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर सुटही हवी आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर १५ दिवस लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. यामुळे ही वाढ हवी असे त्यांनी अमित शहांना सांगितले. लॉकडाऊन ज्या स्थितीमध्ये आहे त्याच स्थितीत आणखी १५ दिवस वाढवावे. मात्र, गोव्यामध्ये रेस्टॉरंट, जिम, हॉटेल सुरु करण्यात यावीत, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
Lockdown must be extended for 15 more days, it is needed, as the graph of #COVID19 is rising: Goa Chief Minister Pramod Sawant https://t.co/b2hmy2Zn0t
— ANI (@ANI) May 29, 2020
गुजरात, महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कोरोनाचे संक्रमन कमालीचे वाढत चालले आहे. तसेच अन्य राज्यांमध्येही ही वाढ आहे. लॉकडाऊन पूर्णपणे उठविल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती या राज्यांनी व्यक्त केली. यामुळे सर्वच राज्ये सध्यापेक्षा जास्त सूट देऊन लॉकडाऊन सुरु ठेवण्याच्या मताची आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राज्यांच्या मागणीचा विचार केल्यास लॉकडाऊन ५ चा टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच या टप्प्यात अन्य व्यवसायांनाही सूट दिली जाऊ शकते. मात्र, ज्या शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता याकडे केंद्र सरकार जास्त लक्ष केंद्रीत करणार आहे. शाळा-कॉलेज बंद राहण्याची शक्यता आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानोड्डानेही बंद ठेवण्यात येतील. धार्मिक स्थळांना सूट मिळू शकते. याचा निर्णय राज्य सरकारांवर देण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये सलून उघडले आहेत. तर जिम आणि शॉपिंग मॉल उघडण्याच्या निर्णयही राज्य सरकारांवरच सोपविला जाण्याची शक्यता आहे.
मेट्रो सेवांनी त्यांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या मार्किंगची तयारी केली आहे. तर काही विशेष रेल्वेही सुरु झाल्या आहेत. विमानेही सुरु झाली आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक व्यवहार सुरु करण्यासाठी मेट्रो सेवा सुरु केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल बाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच नकार कळविला आहे.
लॉकडाऊन का वाढणार?
दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असूनही कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा कमालीचा वाढत आहे. देशात आज सकाळपर्यंत १.६५ लाखहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर ४७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्यात मोठी वाढ पहायला मिळाली होती. ही वाढ पाहता पुढील काळात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे.