Restrictions Again in 2022: लग्न, सभा, शाळा-कॉलेजवर येणार निर्बंध? ओमायक्रॉनवर मोदी सरकारच्या राज्यांसाठी गाईडलाईन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 18:40 IST2021-12-22T18:40:12+5:302021-12-22T18:40:44+5:30
Omicron Guidelines For State Government: डेल्टासह आता ओमिक्रॉन देशाच्या विविध भागात पोहोचला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोरपणे पुढे यावे लागेल. कठोर पावले उचलावी लागतील. त्यांना चाचणी, ट्रॅक आणि पाळत ठेवून कंटेनमेंट झोनचे धोरण पाळावे लागेल.

Restrictions Again in 2022: लग्न, सभा, शाळा-कॉलेजवर येणार निर्बंध? ओमायक्रॉनवर मोदी सरकारच्या राज्यांसाठी गाईडलाईन...
देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉन बाधित सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे. राज्येही वाढू लागली आहेत. 14 राज्यांत एकूण 221 जणांना ओमायक्रॉनी बाधा झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यात आघाडीवर आहेत. यामुळे केंद्र सरकारचे टेन्शन वाढू लागले आहे.
असे असले तरी लोक नवीन व्हेरिअंटबाबत गंभीर नाहीत. सध्या सुट्यांचा मौसम सुरु आहे. यामुळे ओमायक्रॉन वाढण्याची शक्यता असल्याने याचे संक्रमण रोखण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. या लोकांनी नाही पाळल्या आणि रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर गेली तर पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये राज्यांनी परिस्थिती पाहून त्वरीत नाईट कर्फ्यू आणि कंटेनमेंट झोन सारखे उपाय करण्यासाठी अलर्ट रहावे असे म्हटले आहे. गेल्या 18 दिवसांत ही संख्या 100 पटींनी वाढली आहे. परंतू कोणत्याही रुग्णाला आयसीयूमध्ये जावे लागलेले नाही, ही दिलासा देणारी बाब आहे.
केंद्र सरकारने राज्यांना ओमिक्रॉनसाठी वॉर रूम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ओमिक्रॉन विषाणू वेगाने पसरण्यास सक्षम आहे. साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किंवा आयसीयू बेड 40 टक्क्यांहून अधिक भरले असल्यास, जिल्हा किंवा स्थानिक स्तरावर नाईट कर्फ्यू किंवा कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी त्वरित पावले उचलली जावीत.
डेल्टासह आता ओमिक्रॉन देशाच्या विविध भागात पोहोचला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोरपणे पुढे यावे लागेल. कठोर पावले उचलावी लागतील. त्यांना चाचणी, ट्रॅक आणि पाळत ठेवून कंटेनमेंट झोनचे धोरण पाळावे लागेल.
कंटेनमेंट झोन: विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रात्रीचा कर्फ्यू, सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी थांबवावी लागेल. विवाह आणि अंत्यसंस्कारातील लोकांची संख्या मर्यादित ठेवावी लागेल. कार्यालये, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये नियमांची अंमलबजावणी करावी लागेल. रुग्णांच्या संख्येनुसार कंटेनमेंट झोन आणि बफर झोन निश्चित करावे लागतील. जीनोम सिक्वेन्सिंग प्राधान्याने केले पाहिजे.
ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानकांनुसार तपासणी आणि लक्ष ठेवणे ही प्रणाली लागू केली जावी. घरोघरी जाऊन रुग्णाची ओळख पटवण्यासाठी सर्वेक्षण केले पाहिजे. आरटी-पीसीआर चाचणीचे दर वाढवावेत. कोरोनाबाधित व्यक्तीला वेळेवर तपासणी करून उपचाराची सुविधा मिळावी. परदेशातून येणाऱ्या लोकांवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवावे.
क्लिनिकल मॅनेजमेंट: ओमिक्रॉनच्या वाढत्या व्याप्तीनुसार हॉस्पिटलमध्ये बेडची क्षमता वाढवली पाहिजे. रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, औषधांचा साठा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवावा. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी किट उपलब्ध करून द्याव्यात. कॉल सेंटर्स आणि घरोघरी भेटी देऊन रुग्णांवर लक्ष ठेवले पाहिजे. त्याचा उद्देश संसर्गाचा प्रसार रोखणे हा आहे.
लसीकरण: कोरोनाचा वाढता वेग पाहता लसीकरणावर भर द्यायला हवा. पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत लसीकरण केले जाईल हे पहावे. याशिवाय सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या वॉर रूम पुन्हा तयार कराव्यात. योग्य आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी संपूर्ण व्यवस्थाही सुनिश्चित करा जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील.