Lockdown: १ ते ७ जून दरम्यान लोकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 09:05 AM2020-06-01T09:05:37+5:302020-06-01T09:07:33+5:30
१ ते ७ जून या काळात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंत्रणा चालविली जाईल. केंद्राने ८ जूनपासून काही ठिकाणी सूट दिली आहे.
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु होतं. ३१ मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपला आहे. चार टप्प्यांच्या लॉकडाऊननंतर आता अनलॉक १ सुरु झालं आहे. केंद्र सरकारने कंन्टेंन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला आहे. तर इतर ठिकाणी हळूहळू शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनलॉक १ ची सुरुवात ८ जूनपासून सुरू होईल. १ जून ते ७ जून या काळात लॉकडाऊन नसेल किंवा अनलॉक १ देखील सुरु नाही. म्हणून या काळात कोणते नियम कायम राहतील आणि परवानगी काय असेल, हे समजणे फार महत्वाचे आहे.
या एका आठवड्यात काय होईल?
१ ते ७ जून या काळात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंत्रणा चालविली जाईल. केंद्राने ८ जूनपासून काही ठिकाणी सूट दिली आहे. लॉकडाऊन संपल्यावर आणि अनलॉक १ सुरू होण्याच्या दरम्यान एक प्रकारचा 'बफर पीरियड' आहे. कंन्टेंन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा मानस आहे. कोरोनापासून बचावासाठी काही निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. म्हणूनच केंद्राशिवाय इतर राज्यांची मार्गदर्शकतत्त्वे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
१ ते ७ जून पर्यंत आपल्याला किती सूट मिळेल हे आपल्या राज्यातील सरकारवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात तीन टप्प्यात अनलॉकिंगची योजना आहे. ३ जूनपासून काही कामांत शिथिलता आहे, त्यानंतर ५ जूनला सवलतीत थोडीशी वाढ केली जाईल. त्यानंतर ८ जूनपासून केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूट देण्यात येणार आहे. परंतु, महाराष्ट्राने आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिली नाही. या आठवड्यात दिल्लीमध्ये रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत बाहेर पडू शकणार नाही. पहिल्यांदा रात्री ७ ते सकाळी ७ या वेळेत बंदी घालण्यात आली होती. जम्मू-काश्मीरने कोणतीही दिलासा न देता ८ जूनपर्यंत लॉकडाऊन केला आहे. तेलंगणाने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवला आहे, परंतु त्याठिकाणी केंद्राकडून मिळणारी सूट नागरिकांना देण्यात येणार आहे.
१ ते ७ जून पर्यंत बंद
मॉल, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, मंदिरे
शाळा, महाविद्यालय, इतर शैक्षणिक संस्था
आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे सेवा.
जलतरण तलाव / मनोरंजन पार्क / थिएटर / सभागृह / हॉल / बार
अनेक राज्यांनी १ ते ७ जून दरम्यान लोकांना जास्त दिलासा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, कंन्टेंन्मेंट झोनच्या बाहेर सवलत दिली जात आहे. बहुतेक राज्यांकडे आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी आहे, परंतु राज्याबाहेर जाण्यासाठी त्या राज्याची परवानगी लागेल. कर्नाटकमध्ये अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळ, हॉटेल, रेस्टॉरंट ८ जूनपासून सुरू होत आहे. दिल्लीमध्ये आता लोक पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत बाहेर जाऊ शकतील. महाराष्ट्रात फक्त अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशनेही केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूट दिली आहे पण दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद व नोएडा सीमा बंद ठेवल्या आहेत.