Lockdown: लॉकडाऊननंतर आता देशाची ‘अनलॉक’च्या दिशेने वाटचाल; काय असणार राज्यांचा नवा फॉर्म्युला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:31 PM2021-05-24T14:31:30+5:302021-05-24T14:34:12+5:30

Lockdown Updates in India: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने १ जूननंतर लॉकडाऊन वाढणार की नियमांमध्ये सूट मिळणार यावर लोकांचे लक्ष आहे.

Lockdown Extend Or Not Full List Of States Plan To Lift Covid 19 Restrictions New Deadline | Lockdown: लॉकडाऊननंतर आता देशाची ‘अनलॉक’च्या दिशेने वाटचाल; काय असणार राज्यांचा नवा फॉर्म्युला?

Lockdown: लॉकडाऊननंतर आता देशाची ‘अनलॉक’च्या दिशेने वाटचाल; काय असणार राज्यांचा नवा फॉर्म्युला?

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेशात अनेक दिवसांनी अनलॉकला सुरुवात झाली आहे. राज्यातील ५ जिल्ह्यात शिथिलता आणली आहे. पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर, कोचिंग सुरू होण्याची शक्यता नाही.उत्तर प्रदेशमध्ये लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. आता सर्व निर्बंध ३१ मेपर्यंत सुरू राहतीलकर्नाटक सरकारने राज्यात लॉकडाऊन ७ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केली.

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक दिवसांनी पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेने देश वाटचाल करत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, एमपीसह अनेक राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या अशीच घटत राहिली तर १ जूनपासून निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेत दिले आहेत. परंतु काही राज्यात या निर्बंधात कोणतीही सूट मिळणार नसल्याचंही दिसून येत आहे.

दिल्लीत लॉकडाऊन वाढणार नाही?

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ३१ मे च्या पहाटे ५ वाजेपर्यंत हे लॉकडाऊन असेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दिल्लीत १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जर रुग्णसंख्येत घट झाली तर ३१ मेनंतर अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात होईल असं मुख्यमंत्री म्हणालेत. मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रेट ३६ टक्क्यावरून आता २.५ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. मागील २४ तासांत १ हजार ६४९ रुग्ण आढळून आलेत.

महाराष्ट्रात ब्रेक द चेन मोहिमेला यश, मिळणार दिलासा

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने १ जूननंतर लॉकडाऊन वाढणार की नियमांमध्ये सूट मिळणार यावर लोकांचे लक्ष आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिलेत की, येणाऱ्या काळात काही निर्बंधात सूट दिली जाईल. कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम राहिली तर टप्प्याटप्प्याने निर्बंधात सूट देणार आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. राज्य सरकारने १४ एप्रिलनंतर राज्यभरात कडक निर्बंध लागू केले होते. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या ३० हजारांनी कमी झाली. रविवारी दिवसभरात राज्यात २६ हजार ६७२ कोरोना रुग्ण आढळले.

मध्य प्रदेशात अनलॉकला सुरूवात

मध्य प्रदेशात अनेक दिवसांनी अनलॉकला सुरुवात झाली आहे. राज्यातील ५ जिल्ह्यात शिथिलता आणली आहे. ज्या जिल्ह्यात सूट देण्यात आली आहे तेथे संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे. याच आधारावर उर्वरित जिल्ह्यात १ जूनपासून सवलत देण्यात येईल. असे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, आम्ही कायम लॉकडाऊन ठेऊ शकत नाही. १ जूनपासून आम्हाला हळू हळू अनलॉक करावे लागेल. सूट असेल पण पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर, कोचिंग सुरू होण्याची शक्यता नाही. १ जूनपासून सरकारी कार्यालये सुरू होतील पण त्यातही २५ टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती असेल.

उत्तर प्रदेशात काळ्या बुरशीमुळे चिंता वाढली

उत्तर प्रदेशमध्ये लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. आता सर्व निर्बंध ३१ मेपर्यंत सुरू राहतील. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला होता. यूपीच्या शहरी भागात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे, परंतु ग्रामीण भागात वाढणाऱ्या संख्येने सरकार चिंतेत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु आता काळ्या बुरशीचे प्रकार वाढत आहेत. कानपूर, लखनऊ, मथुरा, वाराणसीसह अनेक जिल्ह्यात काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. येत्या आठवड्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झालीय तिथे सूट दिली जाऊ शकते.

बिहारमध्ये आज निर्णय होईल

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी सरकार लॉकडाऊन ५ जूनपर्यंत वाढवू शकते. बिहारमधील पहिलं लॉकडाऊन १५ मेपर्यंत घेण्यात आले होते, त्यानंतर ते २५ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. आज आपत्ती व्यवस्थापन गटाची बैठक बोलविण्यात आली असून त्यात लॉकडाऊन कालावधी दहा दिवसांसाठी वाढविला जाऊ शकतो. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यात वाढ करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. बिहारमधील रुग्णसंख्या ५ हजारांपेक्षा कमी झाली आहे.

केरळ आणि तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन वाढले

१० मे पासून तामिळनाडू पूर्ण लॉकडाऊनमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये कोणत्याही सवलतीशिवाय लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे. केवळ पूर्वीच्या परवानगी असलेल्या हालचालींना सूट दिली जाईल. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोविड -१९ लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमधील पॉझिटिव्हचे प्रमाण २३.१८ आहे, जे लॉकडाऊन सूटसाठी अंदाजे ५ टक्क्यापेक्षा हे जास्त आहे.

कर्नाटकात ७ जूनपर्यंत लॉकडाउन

कर्नाटक सरकारने राज्यात लॉकडाऊन ७ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केली. राज्य सरकारने १० मे पासून पूर्णपणे लॉकडाऊन केले होते. विद्यमान निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की, जर कोणी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले नाही तर पोलीस त्यांच्याविरूद्ध कारवाई करतील. कर्नाटकात ५ लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सुमारे तीन लाख प्रकरणे एकट्या बंगळुरुमध्ये आहेत.

राजस्थानमध्ये ८ जूनपर्यंत लॉकडाऊन

राज्यात लॉकडाऊन ८ जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. आता ८ जूनपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. २४ मे ते ८ जून दरम्यान सकाळी ५:00 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यानुसार शुक्रवार २८ मे दुपारी १२ पासून ते मंगळवार १ जून संध्याकाळी ५ पर्यंत आणि शुक्रवार ४ जून दुपारी १२ पासून मंगळवारी ८ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहतील.

Web Title: Lockdown Extend Or Not Full List Of States Plan To Lift Covid 19 Restrictions New Deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.