हरयाणा, ओदिशातही आता लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:07 AM2021-05-03T06:07:55+5:302021-05-03T06:08:18+5:30
रुग्ण वाढताहेत : आरोग्य सेवेवर कमालाची ताण
चंदीगड : हरयाणात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्यामुळे रविवारी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात तीन मेपासून एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा केली. तत्पूर्वी, गुरुग्राम, फरिदाबाद, पंचकुला, सोनिपत, रोहटक, करनाल, हिसार आणि फतेहाबाद जिल्ह्यांत रात्री दहापासून सकाळी पाच वाजेपर्यंत शुक्रवारपर्यंत वीकेंड संचारबंदी सोमवारी लागू केली होती. तीन मेपासून संपूर्ण राज्यात सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची माहिती गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्विटरवर दिली.
हरयाणात शनिवारी कोविडमुळे १२५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण मृतांची संख्या ४३४१ झाली, तर १३,५८८ नवे रुग्ण नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५ लाख १ हजार ५६६ झाली. रुग्णांत मोठी वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आले असून रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली होती. कोरोनाची सध्याची परिस्थिती ही काळजी करण्यासारखी असल्याचे विरोधी पक्षांनीही म्हटले. परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलण्यात यावी, असे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांनी गुरुवारी म्हटले.
ओदिशात कठोर निर्बंध; बाजारपेठा बंद
nभुवनेश्वर : ओदिशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाच मेपासून १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची घोषणा रविवारी राज्याचे मुख्य सचिव एस. सी. महापात्र यांनी केल्याचे अधिकृत आदेशात म्हटले आहे.
nमहापात्रा यांनी ट्विटर संदेशात हा लॉकडाऊन १९ मेपर्यंत सकाळी पाच वाजेपासून लागू असेल, असे म्हटले. या लॉकडाऊनशिवाय १५ मेपर्यंत शहरी भागांत वीकेंड शटडाऊनही अमलात राहील.
nशटडाऊनमध्ये वैद्यकीय दुकाने आणि रुग्णालये वगळता सगळे बंद राहील. कोणालाही एवढा कडक लॉकडाऊन नको आहे, परंतु सरकारने या महामारीत लोकांचे जीवित सुरक्षित राखण्यासाठी तो लागू केला असल्याचे महापात्रा म्हणाले. देशाच्या इतर भागांत दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तसेच ओदिशातही वाढत आहेत. शनिवारी राज्यात ८ हजार १५ नवे रुग्ण नोंद झाले.