Lockdown: ४५ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक गावात आली; कुटुंबाने काय केलं पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:43 AM2020-05-19T11:43:09+5:302020-05-19T11:43:34+5:30
लॉकडाऊनमुळे गुरुद्वारा बंद झाल्याने तो सोलन, हिमाचल प्रदेश येथे पोहचला. तेथून प्रशासनाने त्याला उत्तरकाशीला पाठवण्याची व्यवस्था केली.
उत्तरकाशी – सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची धार्मिक स्थळदेखील बंद करण्यात आली आहेत. काही ठिकाणी बेपत्ता झालेले अनेकजण पुन्हा त्यांच्या घरी परतत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तरकाशीतील ज्येष्ठवाडी येथील गावातील एक व्यक्ती तब्बल ४५ वर्षानंतर रविवारी दुपारी अचानक त्याच्या गावी परतला. आता त्याचं वय ८४ वर्ष आहे.
कुटुंबासोबत भावनिक नातं नसल्याने घरातील सदस्यांनी त्यांना सहजपणे स्वीकारण्यास तयार नव्हते. पण राजकीय इंटर कॉलेजमध्ये ज्येष्ठवाडी पंचायतीने क्वारंटाईन सुविधा केली होती. त्याठिकाणी वृद्धाच्या खाण्या-पिण्याची सोय कुटुंबीयांनी केली होती. क्वारंटाईन संपल्यानंतर या वृद्धाला घरी नेऊन खाण्याची आणि राहण्याची सोय करु असं कुटुंबाने सांगितले. हा वृद्ध गेल्या अनेक वर्षापासून जालंधरच्या एका गुरुद्वारेत राहत होता. लॉकडाऊनमुळे गुरुद्वारा बंद झाल्याने तो सोलन, हिमाचल प्रदेश येथे पोहचला. तेथून प्रशासनाने त्याला उत्तरकाशीला पाठवण्याची व्यवस्था केली.
ज्येष्ठवाडीतील अजय चौहान यांनी सांगितले की, त्यांचे आजोबा सूरतसिंह चौहान जेव्हा माझे वडील कल्याण सिंह फक्त अडीच वर्षाचे आणि काका त्रेपन सिंह अवघ्या ५ वर्षाचे असताना त्यांना सोडून गेले होते. आज माझ्या वडिलांचे वय ४७ आहे. अनेक वर्षापासून आम्ही आजोबांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काहीही माहिती मिळाली नाही. पण शुक्रवारी तहसिलदारांनी फोन करुन आजोबा जिवंत असून रविवारी सोलनहून उत्तरकाशीला पोहचतील असं सांगितले.
आजीला याची माहिती मिळाल्यानंतर तिला स्वाभाविकपणे राग आला. अडचणीच्या काळात आजोबांनी आजीची साथ सोडली. इतकी वर्ष त्यांचा ठावठिकाणा नव्हता. आजोबांसोबत आमचं रक्ताचं नातं असलं तरी भावनिक बंधन काही नाही. वृद्धाने सांगितले की, त्यांना एक मुलगी होती जी दोन मुलांपेक्षा मोठी होती. त्यांना गावातील शेठ म्हणून ओळखायचे. दुर्दैवाने आई-वडिलांसोबत माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता. पत्नी आणि मुलांबाबत माहिती नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारवर शिवसेनेचा घणाघात; राहुल गांधीवरील टीकेचाही घेतला समाचार, म्हणाले...
डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!
कोरोना नसतानाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प का करतायेत ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’चं सेवन?
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी
कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढला; अमेरिकेतील ‘या’ शहरातून श्रीमंतांनी पळ काढला