Lockdown News: मजुरांना गावी जाण्यासाठी कर्नाटकमध्ये मोफत बससेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 04:07 AM2020-05-04T04:07:07+5:302020-05-04T04:07:21+5:30
मंगळवारपर्यंत मुदत : जादा भाडे आकारणीवर झाली होती टीका
बंगळुरू : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आपल्या गावी परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना मंगळवारपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. कर्नाटक सरकारने रविवारी सकाळी हा निर्णय घेतले. राज्य परिवहन महामंडळ बस प्रवासासाठी आकारत असलेले जादा भाडे बघून मजुरांना मोठा धक्का बसला होता.
या भाडेवाढीविरोधात कर्नाटकमध्ये खूप टीका झाल्याने अखेर राज्य सरकार जागे झाले. लॉकडाऊनमुळे कर्नाटकातील हजारो मजूर बंगळुरूमध्येच गेल्या काही आठवड्यांपासून अडकून पडले होते. त्यांचा रोजगारही बुडाला व गाठीशी असलेले पैसेही संपत आले होते. अशा स्थितीत बंगळुरूमध्ये राहाण्यापेक्षा आपल्या गावी परत गेलेले बरे असा विचार या मजुरांच्या मनात घोळत होता. मात्र सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे त्यांच्यापुढील तोही मार्ग खुंटला. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक प्रभाकर रेड्डी यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग राखणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक बसमधून फक्त ३० लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. या कारणांमुळेच कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या तिकीट दरांत वाढ करावी लागली होती.
बंगळुरू शहरातील मॅजेस्टिक बस स्थानकातून शुक्रवारी आपल्या गावी जाण्यासाठी बस पकडणाºया मजुरांनी खिशाला न परवडणाºया प्रवास भाड्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती यापैकी एका मजुराने सांगितले की, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे बंगळुरू ते रायचूर दरम्यानचे प्रवास भाडे ५०० ते ६०० रुपये होते. आता त्याच प्रवासासाठी १४०० रुपये भाडे मोजावे लागत आहे. ते स्थलांतरित मजुरांच्या खिशाला परवडणारे नाही. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचे वाढलेले भाडे ऐकून काही स्थलांतरित मजुरांनी शुक्रवारी आपल्या गावी न जाण्याचा निर्णय घेतला
काँग्रेसकडून १ कोटी रुपयांची मदत
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाला कर्नाटक प्रदेश काँग्रेसने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. रविवारी सकाळी बंगळुरूहून स्थलांतरित मजुरांना घेऊन एक विशेष रेल्वेगाडी भुवनेश्वरला रवाना झाली. त्या गाडीत १ हजार १९० प्रवासी होते.