योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 07:45 AM2020-04-21T07:45:26+5:302020-04-21T09:39:29+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती समजली तेव्हा ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या टीम-11 सोबत महत्वाची बैठक घेत होते.
लॉकडाऊनमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला येता येणार नसल्याचे पत्र योगी यांनी आईला पाठविले होते. आपण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार असून वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नसल्याचा निर्णय योगी यांनी घेतला होता.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती समजली तेव्हा ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या टीम-11 सोबत महत्वाची बैठक घेत होते. मात्र, निरोप मिळाल्यानंतरही ते विचलीत झाले नाही आणि त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. योगींचे वडील आनंद सिंह बिष्ट यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी योगी यांची मावशी सरोज देवी आणि त्यांचा मोठा मुलगा सत्येंद्र बिष्ट यांच्या सोबत उत्तराखंडला निघाल्या होत्या. त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला प्रवासाचा पासही होता. सहाजिकच आहे, मुख्यमंत्र्यांच्या मावशीने मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी हा पास मागितला होता. त्याला मंजुरी मिळाली.
मात्र, उत्तराखंडच्या सीमेवर पोलिसांनी त्यांना रोखले आणि पुढे जाऊ शकत नसल्याचे सांगत माघारी पाठवून दिले. यामुळे सरोजा देवी यांना रडू कोसळले होते. सरोजा देवी सहारनपूरमधील नवीननगरमध्ये राहतात. योगींच्या वडिलांवर ऋषीकेशहून जवळ ६० किमी अंतरावर पौडी जिल्ह्यातील पंचूर गावामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
सरोज यांनी सांगितले की, उत्तराखंड पोलिसांना मुख्यमंत्री आदित्यनाथांचे नातेवाईक असल्याचे सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा पासही दाखविला. मात्र, पोलिसांनी मान्य केले नाही आणि माघारी पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच सरकारी वाहनही पाठविण्यात आले. या वाहनातून सरोज यांचे दोन मुलगे अंत्यसंस्कारासाठी पुढे गेले. वेळेवर पोहोचू शकणार नसल्याने सरोजा देवी माघारी आल्या. भगवानपूरमध्ये एक पोलीस दारुच्या नशेत होता असा आरोप सरोज यांनी केला आहे. त्यानेच अडवणूक केल्याचे त्या म्हणाल्या.
किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका
'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या