लॉकडाऊनमुळे शंभर लाख टन साखर राहणार शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:47 AM2020-04-14T05:47:05+5:302020-04-14T05:47:15+5:30
‘कोविड-१९’ चा परिणाम : सलग तिसऱ्या हंगामात मोठ्या प्रमाणावर साखर राहणार शिल्लक
विशाल शिर्के
पुणे : लॉकडाऊनमुळे साखरेच्या मागणीत झालेली घट, निर्यातीवर आलेली मर्यादा यामुळे यंदा मार्चअखेरीस देशात तब्बल २२० लाख टन साखर शिल्लक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीतपेय आणि आइस्क्रीम न खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असल्याने मागणीत आणखी घट झाली आहे. त्यामुळे यंदा देशांतर्गत उत्पादन कमी होऊनही सलग तिसºया हंगामात
साखर उद्योगाला शिल्लक साखरेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील हंगाम सुरू होताना किमान शंभर लाख टन साखर शिल्लक राहील,
असा अंदाज साखर क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. देशामध्ये मार्चअखेरीस २३२.७४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा महाराष्ट्र, कर्नाटकामधे ऊस पिकाचे नुकसान झाल्याने या दोन्ही राज्यांत साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे देशातील साखर
उत्पादन २६५ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे. या पूर्वीच्या दोन गाळप हंगामांत प्रत्येकी ३३० ते ३३३ लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले होते. चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी तब्बल १४५ लाख टन साखर देशात शिल्लक होती. त्यामुळे यंदा ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अधिकाधिक साखर निर्यात करून शिल्लकी साखरेचा साठा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनाने देशासह जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद आहेत. तसेच, दक्षता म्हणून शीतपेय आणि आइस्क्रिम खाण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. परिणामी, देशांतर्गत खपही घटला आहे.
मार्च महिन्यात केंद्र सरकारने २१ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला होता. मागणी नसल्याने त्यास १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी साखर उद्योगाने केंद्र सरकारकडे केली होती. तसेच, एप्रिल महिन्याचा कोटा १८ लाख टन करण्यास केंद्र सरकारने मान्यता
दिली आहे.
देशातील साखर स्थिती (२०१९-२० हंगाम, आकडे लाख टनामध्ये)
१ आॅक्टोबर २०१९ शिल्लक साखर १४५.७९
मार्च २०२० अखेरची शिल्लक साखर २३२.७४
एकूण उपलब्ध साखर ३७८
देशांतर्गत खप १३०.१२
निर्यात २८
निर्यात-देशांतर्ग खप वजा शिल्लक २२०.४१
देशाचा साखरेचा वार्षिक खप २६० लाख टन इतका आहे. लग्नसराई आणि उन्हाळ्यात शीतपेय आणि इतर गोष्टींना असलेली मागणी यामुळे ‘मार्च ते मे’ या कालावधीत मासिक सुमारे १ लाख टनांनी मागणी वाढते. कोरोनामुळे व्यवहार ठप्प असल्याने देशांतर्गत मागणीत यंदा घट होईल. युरोपियन देशातही कोरोनाने धुमाकूळ घातला असल्याने निर्यातीवर देखील विपरीत परिणाम होईल. किमान १०० लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे.
-अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन, पुणे