मोदींनी सर्व रस्ते बंद केले म्हणत युवकाची आत्महत्या; मंत्र्याच्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:07 PM2020-04-02T13:07:11+5:302020-04-02T15:04:43+5:30
शिलाँग येथील एल्ड्रीन सीमा चौधरी यांच्या रेस्टरंटमध्ये काम करत होता. त्याने मृत्यूपूर्वी इंग्रजीतून सुसाईडनोट लिहून आपल्या नातलगांना व्हॉट्सएपवर पाठवली.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. हॉटेल क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीला कंटाळलेल्या एका युवकाने आत्महत्या केली आहे. या युवकाने लिहिलेली सुसाईडनोट मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राज्यमंत्र्यांच्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आग्रा येथे रेस्टोरंटमध्ये काम करत असलेल्या एल्ड्रीन लिंगदोह या युवकाने आत्महत्या केली आहे. एल्ड्रीनने लिहिलेली सुसाईडनोट पोलिसांना मिळाली आहे. सुसाईडनोटमध्ये युवकाने म्हटले की, मी एल्ड्रीन लिंगदोह. एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या माता-पित्याचे आधीच निधन झालेले आहे. काही तरी करून दाखवायच म्हणून मी आग्रा येथे आलो होतो. आग्रा येथील कारगील पेट्रोल पंपाजवळील शांती फूडकोर्ट रेस्टोरंटमध्ये काम करत होतो. परतुं, मोदीजींनी माझे सगळे मार्गच बंद करून टाकले. मला कुठेही जाता येत नाही. रेस्टोरंटच्या मालकीन सीमा चौधरी यांनी देखील आपल्यावर दया दाखवली नसल्याचे युवकाने सुसाईड नोटमध्ये म्हटलेआहे.
रेस्टोरंटच्या मालकीन चौधरी यांना मी मदत मागितली होती. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, जिथं जायचं तिथं जा. मी त्यांना म्हटलं की, माझी मदत करा. मी कुठेही जावू शकत नाही. त्यांनी नकार दिल्यानंतर मला एकच रास्ता दिसला, तो म्हणजे आत्महत्या. तुमच्यात थोडीही माणुसकी असेल मृत्यूनंतर माझा मृतदेह माझ्या गावाला पाठवून द्या, अशी विनंती एल्ड्रीनने रेस्टोरंट मालकीनीकडे केली. तसेच सासरे मंत्री असल्यामुळे सीमा चौधरी यांना वाटते की, आपण काहीही करू शकतो, असंही त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
एल्ड्रीनने सुसाईड नोट शिलांग येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सएपद्वारे पाठवली होती. सुसाईडनोटमध्ये एल्ड्रीनने राज्यमंत्री चौधरी उदयभान सिंह यांच्या सुनबाई यांना जबाबदार ठरवले आहे. या सुसाईडनोटच्या आधारे पोलिसांनी राज्यमंत्र्याच्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिलाँग येथील एल्ड्रीन सीमा चौधरी यांच्या रेस्टरंटमध्ये काम करत होता. त्याने मृत्यूपूर्वी इंग्रजीतून सुसाईडनोट लिहून आपल्या नातलगांना व्हॉट्सएपवर पाठवली. ही सुसाईडनोट त्याच्या नातेवाईकांनी मेघालय पोलिसांना पाठवून दिली. मेघालय पोलिसांच्या सुचनेनंतर आग्रा पोलिसांनी हॉटेलमध्ये चौकशी केली असता, एल्ड्रीनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
दरम्यान रेस्टोरंट मालकांनी हे सर्व खोट असल्याचे सांगत एल्ड्रीन चोरीच्या आरोपात शिक्षा भोगून आल्याचे सांगितले. तसेच सहा महिन्यांपासून तो दिल्लीला नोकरी करत होता. तो आता येथे आला होता. त्याला टीबी झालेली होती. त्यातच हॉटेल बंद असल्यामुळे त्याला काम देऊ शकलो नाही. मात्र तो शिडीच्या मदतीने रेस्टोरंटमध्ये घुसला आणि त्याने आत्महत्या केली, असं सीमा चौधरींच्या वतीने सांगण्यात आले.