साबरमती आश्रमात लगबग; ‘रोड शो’नंतर अर्धा तास गांधीजींसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 02:04 AM2020-02-24T02:04:58+5:302020-02-24T06:47:58+5:30
ट्रम्प यांच्या स्वागतासोबतच सुरक्षेसह अन्य व्यवस्था चोख ठेवण्यासाठी लगबग
अहमदाबाद : गेल्या काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उद्या सोमवारी साबरमती आश्रमासही भेट देणार हे नक्की झाल्याने महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या वास्तूत ट्रम्प यांच्या स्वागतासोबतच सुरक्षेसह अन्य व्यवस्था चोख ठेवण्यासाठी रविवारी पुन्हा एकदा लगबग सुरू झाली.
सूत्रांनुसार सुरक्षेच्या चिंतेखेरीज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया यांना सोमवारी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणे सोयीचे व्हावे यासाठी अमेरिकेचे अधिकारी ट्रम्प यांच्या गुजरातमधील कार्यक्रमांतून साबरमती आश्रम शक्यतो वगळावा अशा मताचे होते. परंतु भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील साबरमती आश्रमाचे महत्व व गांधीजींच्या वास्तव्यामुळे त्या ठिकाणचे स्थानमहात्म्य पाहता ट्रम्प यांनी या आश्रमाला भेट देण्याने एक चांगला संदेश दिला जाईल, हे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पटवून दिल्यानंतर आता ट्रम्प यांची साबरमती भेट नक्की झाली आहे. ट्रम्प येतील या शक्यतेने अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठी असलेल्या या आश्रमात रस्त्यांची सफाई व रुंदीकरण, रंगरंगोटी आणि सजावट यासारखी कामे आधीपासूनच सुरु झाली होती. आता ती लगबगीने पूर्ण करण्यात येत आहेत. आश्रमाच्या बाहेर कार पार्किंगसाठी विस्तीर्ण जागा तयार करण्यात आली आहे. तसेच ट्रम्प दाम्पत्य व पंतप्रधान मोदी यांना साबरमती नदीपात्राचे विहंगम दृश्य न्याहाळता यावे यासाठी आश्रमाच्या मागील नदीच्या बाजूस एक विशेष चौथरा उभारून आसनव्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मान्यवर पाहुण्यांना ‘फ्रेश’ होऊन विश्रांती घेता यावी यासाठी खास ‘ग्रीन रूम’चीही सोय करण्यात आली आहे. महत्मा गांधींनी या साबरमती आश्रमात बराच काळ वास्तव्य केले होते. महात्माजींनी १२ मार्च १९३० रोजी मिठाच्या सत्याग्रहासाठी ‘दाडी मार्च’ येथून सुरु केला होता. (वृत्तसंस्था)
कार्यक्रमात थोडा बदल
सूत्रांनी सांगितले की, आधी ट्रम्प अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर तेथून ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम होणार असलेल्या मोटेरा स्टेडियमपर्यंत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘रोड शो’ करत जायचे असे ठरत होते. परंतु आता ‘रोड शो’ व ‘नमस्ते ट्रम्प’ या दरम्यान वेळ काढून ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे अन्य पाहुणे साबरमती आश्रमाला सुमारे अर्धा तास भेट देतील.