लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील; एक देश, एक निवडणुकीबाबत रामनाथ कोविंद समितीची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 05:48 AM2024-03-15T05:48:36+5:302024-03-15T05:49:00+5:30
कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना १८ हजारांहून अधिक पानांचा अहवाल सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पहिल्या टप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका घ्याव्या. दुसऱ्या टप्प्यात १०० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेतील समितीने ‘एक देश, एक निवडणूक’बाबत अहवालात गुरुवारी केली.
कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत राष्ट्रपती भवनात अहवाल सादर केला. एकाचवेळी होणाऱ्या निवडणुकांमुळे विकास व सामाजिक एकसंधता वाढेल, लोकशाही पाया अधिक मजबूत होईल आणि “इंडिया म्हणजे भारत”चे स्वप्न साकार करण्यात मदत होईल, असे समितीच्या १८,००० हून अधिक पानांच्या अहवालात म्हटले आहे.
अहवाल राष्ट्रपतींना सादर करताना कोविंद यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंग, सुभाष कश्यप, गुलाम नबी आझाद आणि कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह इतर समिती सदस्य होते.
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या उच्चस्तरीय समितीने ६२ पक्षांशी संपर्क साधला, ज्यापैकी ४७ पक्षांनी प्रतिसाद दिला. त्यातील ३२ पक्षांनी एकाच वेळी निवडणुका घेण्याचे समर्थन केले, तर १५ पक्षांनी विरोध केला.
समितीच्या अहवालात कोणत्या शिफारशी?
- त्रिशंकू सभागृह किंवा अविश्वास प्रस्ताव किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास नवीन लोकसभा स्थापन करण्यासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. त्या उर्वरित कालावधीसाठी असतील.
- विधानसभेसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील व विधानसभा लवकर विसर्जित केल्या नसतील, तर लोकसभेच्या कार्यकाळ समाप्तीपर्यंत त्या चालू राहतील.