Lok Sabha Bypoll Results 2018: ...तर भाजपाला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात फक्त 'इतक्या' जागा मिळतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 11:50 AM2018-06-01T11:50:38+5:302018-06-01T11:50:38+5:30
उत्तर प्रदेशाताली स्थिती भाजपासाठी चिंताजनक
लखनऊ: लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये वारंवार स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवांमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा धुव्वा उडाला होता. त्यानंतर काल कैराना लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवारानं भाजपाला धूळ चारली. 2014 मध्ये नरेंद्र मोदींना केंद्रात पूर्ण बहुमत मिळवून देण्यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. त्यावेळी भाजपानं उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता उत्तर प्रदेशातील स्थिती भाजपासाठी अनुकूल राहिलेली नाही. एबीपी न्यूजच्या आकडेवारीनुसार, आज लोकसभा निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाला 80 पैकी फक्त 19 जागा मिळतील.
कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामींच्या शपथविधी दिसलेली विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ उत्तर प्रदेशातील कैरानातही दिसली. राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपा खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे मिळणारी सहानभूतीची मतंदेखील भाजपाला तारु शकली नाहीत. त्यामुळे भाजपाला कैरानात पराभूत व्हायला लागलं. 2014 मध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला उत्तर प्रदेशात 43 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला झालेल्या मतदानाची बेरीज 42 टक्के होते. याशिवाय काँग्रेसला 12 टक्के तर अन्य पक्षांना 7 टक्के मतं मिळाली होती.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यास, उत्तर प्रदेशात भाजपाचे बुरे दिन आल्याचं चित्र दिसतंय. सध्याचा मतदानाचा पॅटर्न पाहता एनडीएला 35 टक्के मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मिळून 46 टक्के मतं मिळाली आहेत. यामध्ये काँग्रेसच्या 12 टक्के आणि इतर पक्षांच्या 3 टक्के मतांची भर पडल्यास हा आकडा थेट 60 टक्क्यांवर जातो. गेल्या चार वर्षांमधील आकडेवारी पाहिल्यास, भाजपाच्या मतांमध्ये 8 टक्क्यांची घट झालीय. मात्र याचवेळी विरोधक एकत्र येत असल्यानं त्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ होतेय. त्यामुळे आज लोकसभेची निवडणूक झाल्यास आणि उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र लढल्यास भाजपाला 80 पैकी फक्त 19 जागांवर यश मिळेल आणि विरोधी पक्ष तब्बल 61 जागांवर विजयी होतील.