...अन् अमित शहा नातीपुढे हरले; भाजपाच्या टोपीने केली आजोबांची फजिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:33 PM2019-03-30T13:33:20+5:302019-03-30T13:34:46+5:30
अमित शाह यांच्या कडेवर असलेल्या नातीच्या डोक्यातील आधीची टोपी काढून भाजपची टोपी घालण्यात आली. परंतु, त्यांच्या नातीला भाजपची टोपी आवडली नाही. तिने भाजपची टोपी दोन-तीन वेळा काढून टाकली.
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज गांधीनगर येथून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते. दिग्गज नेत्यांची उपस्थितीत असताना अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया एक गंमतीदार घटनेमुळे चर्चेत आली आहे.
अमित शाह यांची रॅली सुरू असताना त्यांची नात देखील तिथे उपस्थित होती. उन्हापासून वाचविण्यासाठी नातीला टोपी घालण्यात आलेली होती. यावेळी भाजपची रॅली असल्यामुळे अनेकांनी भाजपच्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्याचवेळी शाह यांच्या कडेवर असलेल्या नातीच्या डोक्यातील आधीची टोपी काढून भाजपची टोपी घालण्यात आली. परंतु, त्यांच्या नातीला भाजपची टोपी आवडली नाही. तिने भाजपची टोपी दोन-तीन वेळा काढून टाकली. तसेच आपली आधीची टोपी घालणेच पसंत केले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
भाजपचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या गांधीनगरमधून शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य रॅली देखील काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे याबरोबरच रामविलास पासवान, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाशसिंह बादल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही उपस्थित आहेत.