Lok Sabha Elecation 2019 : 'युपी'तही भाजपचे 'नारीशक्ती'ला प्राधान्य; ८ महिलांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:55 AM2019-03-27T11:55:02+5:302019-03-27T11:55:25+5:30
उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपनेचे आपल्या वाट्याला आलेल्या सहा पैकी चार जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजप महिलांना सर्वाधिक उमेदवारी देणार पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई - भारतीय जनता पक्षाने सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठीची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशातील २९ उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशात देखील भाजपकडून आतापर्यंत पाच महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील आतापर्यंत ६२ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात आठ महिला उमेदवारांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपनेचे आपल्या वाट्याला आलेल्या सहा पैकी चार जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजप महिलांना सर्वाधिक उमेदवारी देणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
भाजपकडून उत्तर प्रदेशात आतापर्यंत मनेका गांधी, रिता बहुगुणा जोशी, रेखा वर्मा, संघमित्रा मौर्य, निरंजन ज्योती, हेमा मालिनी, स्मृती इराणी आणि जया प्रदा यांना उमेदवारी दिली आहे. तर १३ विद्यमान खासदारांचा भाजपकडून पत्ता कट कऱण्यात आला आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या घटक पक्षाला मिर्झापूर येथील जागा आधीच देण्यात आली आहे.
उमेदवारांच्या चौथ्या यादीत भाजपने ४ खासदारांचे तिकीट कापले असून यापैकी दोन खासदारांनी आधीच भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांचे मतदार संघ बदलण्यात आले आहे. मनेका यांना वरुण गांधींच्या सुलतानपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण गांधी पिलीभीतमधून निवडणूक लढविणार आहेत. तर जया प्रदा यांना रामपूरमधून आजम खान यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.