लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 01:48 PM2019-05-11T13:48:40+5:302019-05-11T13:50:50+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. याला तीन नेते अपवाद आहेत.

Lok Sabha Election 2019: 3 leaders from 3 states may become kingmakers if no one get clear majority | लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार!

लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार!

Next
ठळक मुद्दे२७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत.

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचं मतदान उद्या १२ मे रोजी होतंय. त्यानंतर, १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यांत ५९ जागांवर मतदान होईल आणि मग सगळ्यांच्या नजरा खिळतील, त्या २३ मे या तारखेवर. लोकसभेचा महासंग्राम कुणी जिंकला, हे या दिवशी ठरणार आहे. २७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज काही जण वर्तवताहेत. तो जर खरा ठरला आणि लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. हे त्रिकूट 'किंगमेकर' का ठरू शकतं, हे आकडे पाहून सहज लक्षात येईल. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. एनडीए किंवा यूपीएसोबत नसलेले पक्षही काय वेळप्रसंगी आपलं कौल कुणाला देतील, हे स्पष्ट दिसतंय. याला तीन नेते अपवाद आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे नेते केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी या तिघांनीही आपले पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. त्यामुळे लोकसभेचे निकाल त्रिशंकू लागल्यास या त्रिकुटाला 'अच्छे दिन' येतील.

ओडिशा (२१), आंध्र प्रदेश (२५) आणि तेलंगणा (१७) या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दलाने २०, वायएसआर काँग्रेसने ९ आणि टीआरएसने ११ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच, ६३ पैकी ४० खासदार या तीन पक्षांचे होते. यावेळी त्यांची ताकद वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. म्हणजेच, ते यावेळीही 'चाळिशी' सहज पार करू शकतात आणि त्या जोरावर भाजपा किंवा काँग्रेसला ४४० व्होल्टचा झटका देऊ शकतात. 

जगनमोहन रेड्डी पाठिंब्यासाठी 'रेडी', पण...

आंध्र प्रदेशच्या सर्व २५ जागांवर ११ एप्रिलला मतदान झालं आहे. इथे चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांमध्ये थेट लढत आहे. कुणाशीही आघाडी न करता, हे दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरलेत. चंद्राबाबूंनी मोदी सरकारविरोधात धडक मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळालं. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांची काँग्रेससोबतची जवळीक वाढली. एका म्यानात या दोन तलवारी राहणं थोडं कठीण असल्यानं जगनमोहन रेड्डी एनडीएच्या गोटात येऊ शकतात. अर्थात, जो आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्याला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी आधीच जाहीर केली आहे.    

पटनायक 'नवीन' भूमिका घेतील?

बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. याउलट, भाजपासोबत युती करून ते निवडणूक लढलेत आणि सरकारमध्येही एकत्र राहिलेत. २००९ नंतर यंदा प्रथमच बीजेडीनं स्वबळावर निवडणूक लढवली आहे. त्यांची लढाई भाजपा आणि काँग्रेसशी आहे. प्रचारात या तीनही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केलीय. बीजेडी आत्तापर्यंत काँग्रेसपासून जितकी दूर होती, तितकीच ती भाजपापासूनही राहिली. पटनायक निकालांनंतर याच भूमिकेवर कायम राहतात की 'नवीन' भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

केसीआर... आर या पार?

अलीकडेच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत के चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसनं मुसंडी मारली होती. हे चित्र पाहता, तेलंगणामधील लोकसभेच्या १७ जागा भाजपा आणि काँग्रेससाठी 'खतरा' ठरू शकतात, असं स्पष्ट दिसतंय. सध्या तरी केसीआर यांना केंद्रात भाजपाचंही सरकार नकोय आणि काँग्रेसचंही. त्यादृष्टीनं त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केलीय. परंतु, तिसऱ्या आघाडीची घडी बसण्याची शक्यता कमीच असल्यानं केसीआर आर की पार हे निकालांनंतरच कळेल. 

दरम्यान, भाजपाच्या जागा कमी होतील, पण एनडीए बहुमताचा आकडा पार करेल, असाही एक अंदाज आहे. तसं झाल्यास हे पक्ष फारसे प्रकाशझोतात येतील, असं वाटत नाही. 

Web Title: Lok Sabha Election 2019: 3 leaders from 3 states may become kingmakers if no one get clear majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.