'जे पाकला ७० वर्षांत जमलं नाही, ते मोदी-शहांनी ५ वर्षांत केलं'; केजरीवालांचा वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 02:11 PM2019-02-25T14:11:40+5:302019-02-25T14:21:57+5:30
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागला आहे.
दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १ मार्चपासून उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच, केजरीवाल यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आणि मोदी-अमित शहा जोडीवर शरसंधान केलं आहे. या दोघांना पराभूत करणं हे प्रत्येक देशभक्त व्यक्तीचं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारतात द्वेषाचं वातावरण निर्माण करून इथल्या शांततेचा भंग करण्यासाठी पाकिस्तान ७० वर्षं प्रयत्न करत होता. त्यांना जे जमलं नाही, ते मोदी-शहांनी पाच वर्षांत केलंय, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे मोदी सरकारविरोधी महाआघाडीत सहभागी झाले आहेत. महाआघाडीतील सर्वच पक्षांवर त्यांनी काही वर्षांपूर्वी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. परंतु, मोदी सरकार पाडण्यासाठी ते त्यांच्यासोबत जात आहेत. मोदी आणि अमित शहा मिळून देशातील लोकशाही संपुष्टात आणत असल्याचा आरोप त्यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
आज देशात भीतीचं वातावरण आहे. जाती आणि धर्माच्या आधारे जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय. जोवर देशात शांतता प्रस्थापित होत नाही, तोवर विकास शक्य नाही. त्यामुळे मोदी-शहांना सत्तेपासून रोखणं हा आपला धर्मच आहे, अशी भूमिका केजरीवाल यांनी मांडली. हे पुन्हा सत्तेत आल्यास देशात निवडणुकाच बंद करतील, राज्यघटना बदलून टाकतील, हिटलरप्रमाणे हुकूमशाही सुरू होईल, असा हल्ला त्यांनी चढवला.
पिछले चार साल में मोदी सरकार आदेश पारित करके दिल्ली सरकार की शक्तियाँ छीनती गयी। CCTV, स्कूल, अस्पताल, मोहल्ला क्लीनिक, आदि - दिल्ली वालों के हर काम में अड़चनें अड़ाईं। हमने सब किया - इनके सामने गिड़गिड़ाए, धरना किया, कोर्ट गए। जब कोई रास्ता नहीं बचा तो उपवास कर रहे हैं।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 24, 2019
दिल्लीतील जनतेनं भाजपा आणि काँग्रेसला सर्वच्या सर्व जागा देऊन पाहिल्या, पण दोघांपैकी कुणीच दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकलं नाही. यावेळी मतदारांनी आम आमदी पार्टीला संधी देऊन पाहावं, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं.
BJP's opposition to statehood for Delhi now is its confession that Modi ji lied to the people of Delhi in 2014 Lok Sabha elections. People of Delhi will respond to lies & decades of deceit appropriately now.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 24, 2019