भाजप मंत्र्याला बेरोजगारीवरून जाब विचारणाऱ्याला पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 16:31 IST2019-04-21T16:10:04+5:302019-04-21T16:31:04+5:30
मी १० वर्षांपासून भाजपला मतदान देत आहे. तरीही मला नोकरी का मिळाली नाही. दर्शनच्या प्रश्नाने बैठकीत वातावरण चिघळले. दर्शनला त्यानंतर पोलिसांनी कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केलं.

भाजप मंत्र्याला बेरोजगारीवरून जाब विचारणाऱ्याला पोलिसांकडून अटक
मुंबई - लोकसभा निवडणुकीत तुम्ही तुमच्या मतदारसंघातील नेत्यांना प्रश्न विचारणार असेल तर थोड थांबा आणि ही बातमी वाचा. कारण,गोव्यातील एका तरुणाने नेत्याला प्रश्न विचारल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचारासाठी आलेल्या आरोग्यमंत्र्यांसमोर तरुणांने बेरोजगारीसंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंत्र्यांना जाब का विचारला, यामुळे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गोवा उत्तर क्षेत्रातून लोकसभाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक रिंगणात आहे. १८ एप्रिलच्या संध्याकाळी वालपोई मतदारसंघातून त्यांच्या समर्थनात एक बैठक झाली. राज्य आरोग्य मंत्री विश्वजित राणेही उपस्थित होते. राणे हे यावेळी बैठकीत नागरिकांशी चर्चा करत होते.
आरोग्य मंत्री राणे नागिरकांशी बोलत असतानाच तिथे उपस्थित असलेल्यापैकी दर्शन गांवकर नावाच्या एका तरुणाने अचानक प्रश्न केला. मी १० वर्षांपासून भाजपला मतदान देत आहे. तरीही मला नोकरी का मिळाली नाही. दर्शनच्या प्रश्नाने बैठकीत वातावरण चिघळले. दर्शनला त्यानंतर पोलिसांनी कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केलं.
जामिनावर सुटल्यानंतर दर्शनने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोग्य मंत्री यांना मी बैठकीत फक्त नोकरी बद्दल विचारले असता मला बैठक संपताच पोलिसांनी अटक केली. १० वर्षांपासून मी त्यांना पाठींबा देत असल्याचा सुद्धा त्याने सांगितले.