चक्क गाढवावरून स्वारी करत भरला उमेदवारी अर्ज, पण : झाला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:30 PM2019-05-02T16:30:14+5:302019-05-02T17:00:17+5:30
भूषण शर्मांना गाढवावर बसल्याचे पाहून लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शर्मा यांनी गाढवावरून स्वारी करत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले व आपला उमेदवारी अर्ज दाखल केले.
मुंबई - लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवारांना अलिशान गाड्यामधून जाताना आजपर्यंत आपण अनेकदा पाहिले असतील. मात्र, बिहार मधील जहानाबाद लोकसभा मतदार संघात एक अपक्ष उमेदवार चक्क गाढवावरून स्वारी करत आपला उमेदवारी अर्ज भरायला आल्याचा प्रकार समोर आला. मात्र या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहार मधील जहानाबाद लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी ( सोमवारी ) अपक्ष उमेदवार भूषण शर्मा हे चक्क गाढवावरून स्वारी करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचले. भूषण शर्मांना गाढवावर बसल्याचे पाहून लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शर्मा यांनी गाढवावरून स्वारी करत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले व आपला उमेदवारी अर्ज दाखल केले.
गाढव हा विश्वासू प्राणी असून तो प्रचंड मेहनतीने आपले काम करत असतो. मालकांनी त्याला मारले तरीही तो आपला काम करत असतो आणि कधीच आपला अपमान झाले अस त्याला वाटत नाही. त्यामुळेच मी गाढवावरून स्वारी करून आल्याचे भूषण शर्मा यांनी सांगितले.
भूषण शर्मा यांना मात्र गाढवाची स्वारी महागत पडली आहे. गाढवावरून स्वारी केल्यामुळे त्यांच्यावर प्राणी अत्याचारप्रतिबंध कायद्याप्रमाणे जहानाबाद येथील नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहानाबाद लोकसभा मतदार संघात मात्र भूषण शर्मांची चांगलीच चर्चा रंगली आहे.