भाजप उमेदवार हंसराज हंस दलित नसून मुस्लीम, 'आप'चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 05:45 PM2019-05-03T17:45:31+5:302019-05-03T17:46:39+5:30
दिल्लीतील उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र भाजपने या मतदार संघातून जो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला तो उमेदवार अनुसूचित जातीचा नाहीच. हंसराज यांनी उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याचा आरोप 'आप'चे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेटमंत्री राजेंद्र पाल यांनी केला आहे.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे उत्तर पश्चिम दिल्लीतील लोकसभा उमेदवार हंसराज हंस यांच्या धर्मावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हंसराज हंस हे दलित नसून मुस्लीम असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र भाजप उमेदवार अनुसूचित जातीचे नसून या मुद्दावर न्यायालयात जाणार असल्याचे 'आप'च्या वतीने सांगण्यात आले आहे.
दिल्लीतील उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र भाजपने या मतदार संघातून जो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला तो उमेदवार अनुसूचित जातीचा नाहीच. हंसराज यांनी उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याचा आरोप 'आप'चे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेटमंत्री राजेंद्र पाल यांनी केला आहे.
हंसराज हंस यांनी २० फेब्रुवारी २०१४ मध्ये धर्म परिवर्तन करून इस्लाम धर्म स्वीकारला होता. या संदर्भात अनेक वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या. अनेक वृत्तवाहिन्यांनी या बातमीला मोठे स्थान दिले होते. धर्म परिवर्तन करून हंसराज हंस यांनी आपले नाव मोहम्मद युसूफ ठेवले होते, असंही राजेंद्र पाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजप उमेदवार हंसराज हंस यांनी आधाची धर्मपरिवर्तन केले आहे. त्यामुळे त्यांना आता दलित मानले जाऊ शकत नाही. तर उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपला आपला उमेदवार बदलावा लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याचा आरोप करत 'आप'ने न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयात हंसराज हंस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे 'आप'च्या वतीने सांगण्यात आले आहे.