भाजपची डोकेदुखी ; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एका महिन्यात ३ वेळा वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:38 AM2019-05-17T11:38:56+5:302019-05-17T11:40:56+5:30
प्रज्ञा ठाकुरांच्या आक्षेपार्ह विधानावरून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ७२ तासांसाठी प्रचार बंदी सुद्धा घातली होती.
मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानावरून भाजपची डोकेदुखी वाढत आहे. १७ एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांनी एका महिन्यात ३ वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांच्या अशा विधानावरून भाजपला वेळोवेळी खुलासा करावा लागत आहे. नथुराम गोडसेच्या विधानावरून भाजपने हात वरती केल्याने, अखेर ठाकूर यांनी माफी मागीतीली आहे.
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे आक्षेपार्ह विधाने काही थांबता थांबेना. शहीद हेमंत करकरे आणि राम मंदिरच्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत आलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला आहे. त्यांच्या अशा वादग्रस्त विधानावरून भाजपवर टीका होत आहे. भाजपमध्ये प्रवेश घेताच, त्याचदिवशी त्यांना भोपाळ मधून उमेदवारी देण्यात आली होती. या एक महिन्याच्या काळात प्रज्ञा ठाकूर यांनी ३ वेळा मोठी वादग्रस्त विधाने केली आहेत.
"हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, त्यांना सांगितलं होतं की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला," असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सुरवातीला केले होते. त्यांनतर, बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ तिच्या छतावर गेली नव्हती तर पाडण्यासही मदत केली होती, असे वक्तव्य प्रज्ञासिंह यांनी केले होते. आता पुन्हा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची वादग्रस्त विधानाची मालिका काही थांबताना दिसत नाही.
प्रज्ञा ठाकुरांच्या आक्षेपार्ह विधानावरून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ७२ तासांसाठी प्रचार बंदी सुद्धा घातली होती. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानाने अडचणीत आलेल्या भाजपने सावध भूमिका घेतली आहे. प्रज्ञा ठाकुरांच्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी' असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं होतं.