Lok Sabha Election 2019 : भाजपनेते गिरीराज सिंह बेगुसरायमधून माघारीच्या तयारीत ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:19 PM2019-03-25T14:19:04+5:302019-03-25T14:19:56+5:30
गिरीराज सिंह नवादा मतदार संघातून खासदार आहेत. परंतु एनडीएच्या जागा वाटपात नवादा मतदार संघ 'एलजेपी'कडे गेला आहे.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आपला मतदार संघ बदलल्यामुळे नाराज आहेत. तसेच त्यांनी बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे समजते. गिरीराज यांनी त्यांचा नवादा मतदार संघ बदलण्यासाठी बिहार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना जबाबदार धरले आहे.
बेगुसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून गिरीराज सिंह यांची समजूत काढण्यात येत आहे. गिरीराज सिंह नवादा मतदार संघातून खासदार आहेत. परंतु एनडीएच्या जागा वाटपात नवादा मतदार संघ 'एलजेपी'कडे गेला आहे. त्यामुळे भाजपकडून गिरीराज सिंह यांना बेगुसरायमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. मात्र मतदार संघ बदलल्यामुळे गिरीराज सिंह नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी आपण नवादा मतदार संघातूनच निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे. ज्या उमेदवारांचे तिकीट निश्चित झाले, त्या उमेदवारांनी लगेच आपला मतदारसंघ गाठला आहे. मात्र भाजपनेते गिरीराज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील अद्याप दिल्लीत असून उमेदवारी बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
बेगुसराय मतदार संघातून सीपाआयने जेएनयू नेता कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने तन्वीर हसन यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. परंतु बेगुसरायमधून कन्हैया कुमार यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास गिरीराज सिंह तयार नाहीत, त्यामुळे यावर भाजप काय पर्याय काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रविवारी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कन्हैया कुमारने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपली मुख्य लढाई भाजप नेते गिरीराज सिंह यांच्याविरुद्ध असून 'आरजेडी'शी नसल्याचे कन्हैया कुमार यांनी सांगितले. गिरीराज सिंह यांनीच कन्हैया कुमार देशद्रोही असल्याचे अरोप केले होते. आता दोघे लोकसभा निवडणुकीत एकमेकांना आव्हान देणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये काट्याची टक्कर होणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिहारमध्ये ४० लोकसभा मतदार संघ असून ७ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.