Lok Sabha Election 2019: ...म्हणून सेलिब्रिटींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यास भाजपा अनुत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:54 AM2019-03-14T06:54:55+5:302019-03-14T06:55:43+5:30
विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर भाजपाकडून लोकसभा लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात क्रिकेट, चित्रपट, कला आदी क्षेत्रातील नामवंतांना (सिलेब्रिटीज) उतरवण्यास भाजपाचे श्रेष्ठी फारसे उत्सुक नाहीत. मात्र काही प्रसार माध्यमांनी भाजपाविरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर हे माजी क्रिकेटपटू, चित्रपट अभिनेते सनी देओल आणि इतरांना उमेदवारी देण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त दिले होते.
एखाद्या क्षेत्रात नाव आहे म्हणून भाजपाला त्यांना मैदानात उतरवणे आवडणार नाही, असे भाजपाच्या संसदीय मंडळाच्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तो म्हणाला, क्रिकेट, चित्रपट वा कला क्षेत्रातील बुद्धिमान लोकांना सामावून घेण्याच्याविरोधात पक्ष नाही. ज्या दोघांनी उत्सुकता दाखवली त्यांच्याशी आम्ही बोलत आहोत. परंतु, हे ख्यातकीर्त लोक आमच्यासाठी संपत्ती न बनता लोढणे बनले, असा आमचा अनुभव आहे.
खासदार हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा अपवाद वगळता इतर कोणी पक्षासाठी टिकून राहून गांभीर्याने काम केले, असे नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षात २८ वर्षे काम केल्यानंतरही आता ते जवळपास बंडाच्या पायरीवर उभे आहेत. दुसरे म्हणजे कीर्ती आझाद, सिन्हा आणि नवज्योत सिंग सिद्धू हे भाजपातून बाहेर पडल्यावर पक्षाचे नेतृत्व अशा व्यक्तींना मोठ्या संख्येने पक्षात घेण्याबाबत सावधपणे पावले टाकत आहेत.
या वलयांकित लोकांना भाजपाचे चांगले स्थान असलेल्या राज्यांतून पक्षात सामावून घेण्याऐवजी भाजपाला आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांतील सेलिब्रिटीजना पक्षात सामावून घ्यायला आवडेल.
गंभीर आणि सेहवाग हे निवडणूक लढण्यास खूपच उत्सूक असले तरी ते राजकीय किंवा सामाजिक कार्यात सक्रिय नाहीत. अभिनेता अक्षय कुमार यांनी पक्षात यावे असे भाजपाला वाटते. परंतु, ते निर्णयासाठी वेळ घेतील. गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची अक्षय खन्ना यांची इच्छा आहे. अक्षय खन्ना यांचे वडील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी या मतदारसंघाचे भाजपाकडून प्रतिनिधित्व केले होते. मोहनलाल आणि सनी देओल हेदेखील इच्छूक आहेत.
गौतम गंभीर नाही
परंतु, अंतिम निर्णय घेतला गेलेला नाही. याआधी अभिनेत्री माधुरी दीक्षित (मुंबई/पुणे) आणि मोहन लाल (तिरूवनंतपूरम) यांची नावे लोकसभा मतदारसंघांसाठी सांगण्यात आली. गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी जनसंपर्क मोहिमेत माधुरी दीक्षित यांची व क्रिकेटपटू कपिल देव यांची भेट घेतली होती. नवी दिल्लीतून गौतम गंभीर यांना मैदानात उतरवले जाणार नाही. ही जागा मीनाक्षी लेखी यांच्याकडे असून त्यांना महत्वाच्या जबाबदारीसाठी तयार केले आहे.
भाजपाला आपला विस्तार वरील राज्यांत व्हावा, असे वाटते. त्यामुळेच त्याने सुरेश बाबू, मेरी कोम यांना राज्यसभेवर घेतले. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आदी राज्यांत प्रचंड अस्तित्व असल्यामुळे भाजपा नेत्यांना या राज्यांतून सिलेब्रिटीजना घेण्याची उत्सुकता नाही. भाजपाने २०१४ मध्ये भाजपाने परेश रावल (गुजरात) आणि राज्यवर्धन राठोड (राजस्थान) यांना लोकसभेवर निवडून आणले होते.