Lok sabha Election 2019 - भाजपाच्या गिरिराज सिंहांना कन्हैय्या कुमारचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:17 PM2019-03-23T17:17:20+5:302019-03-23T17:18:17+5:30
भाजपा नेते गिरिराज सिंह हे नवादा येथील जागेवरुन निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.
पाटणा - भाजपानेबिहारमधील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून गिरिराज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिहारमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बेगमसराय मतदासंघात आता गिरिराजसिंह विरुद्ध जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार असा सामना रंगणार आहे.
भाजपा नेते गिरिराज सिंह हे नवादा येथील जागेवरुन निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पण, पक्षाने त्यांच्या खांद्यावर बेगूसराय मतदारसंघाची धुरा देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून गिरिराजसिंह यांना विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारचे आव्हान असणार आहे. कन्हैय्या कुमार कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडियाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार आहे. भाजपाने या मतदारसंघात उमेदवार देताना जातीय समीकरण लक्षात घेऊनच गिरिराजसिंह यांना उमेदवारी दिली आहे. कारण, कन्हैय्या कुमार आणि गिरिराजसिंह हे दोघेही भूमिहार या जातीतून येत आहेत. तर दोन्ही नेत्यांची प्रतिमा आक्रमक आहे. मात्र, महाआघाडीकडून या जागेवर कन्हैय्या कुमारला पाठिंबा मिळाल्यास गिरिराज सिंह यांच्यासाठी ही उमेदवारी धोक्याची घंटा ठरू शकते. तर, कन्हैय्या कुमार हा या मतदारसंघातून नवा चेहरा असल्याने कोरी पाटी आहे. तर, गिरिराज सिंह हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, पण या मतदारसंघासाठी ते नवखे असून येथे सांगण्यासाठी त्यांना कुठल्याही कामाचा आधार मिळणार नाही. कारण, या मतदारसंघात अद्याप त्यांच्यामार्फत एकही रुपया किंवा विकासकाम करण्यात आलेलं नाही.