Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 11:22 AM2019-05-21T11:22:53+5:302019-05-21T11:35:54+5:30
मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यात घेण्यात आलेले मतदान 19 मे रोजी संपले. मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. 22 मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्यादिवशी फेरमतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे.
22 मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या आधी तसेच मतदानाच्या दिवशी मोठा हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी अशा वादग्रस्त मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याविषयी गोयल यांची निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली झाली. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाण प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केल्याचं गोयल यांनी म्हटलं होतं.
Election Commission: Poll held on 19th May at polling station number 200 of the Kolkata Uttar parliamentary constituency declared void. Re-poll to be held on 22nd May from 7am to 6pm. #WestBengalpic.twitter.com/GbEyswN73z
— ANI (@ANI) May 21, 2019
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी किरकोळ हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात मात्र हे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. तनरतारन येथे झालेल्या चकमकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकजण जखमी झाले होते. हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या प्रत्येक मतदानाच्या टप्प्यात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना समोर आल्या होत्या.
सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली होती.