मसूद अजरला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरज पडली नसती : दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 12:12 PM2019-04-28T12:12:40+5:302019-04-28T13:46:41+5:30
पाकिस्तान मधील स्थायिक असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला.
मुंबई - जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असे म्हणत भोपाळ मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. भोपाळ येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
शहीद हेमंत करकरे यांना आपण शाप दिल्यानेच त्यांचा सर्वनाश झाला, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. पाकिस्तान मध्ये लपवून बसलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला.
दहशतवादी नरकात जाऊन जरी लपले, तरीही आम्ही त्यांना शोधून काढू असे देशाचे पंतप्रधान म्हणाले होते. पुलवमा, पठाणकोट आणि उरी मधील हल्ले झाल्यावर पंतप्रधान कुठे गेले असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला. भारतात नेहमीच होणाऱ्या दहशतवादी हल्ले कधी थांबतील अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माझी उमेदवारी जाहीर झाल्याने माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण घाबरले आहेत. उमा भारतींनी निवडणुकीत उतरण्यास नकार दिला. अखेर शेवटच्या दिवशी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी दाखल केली, अशा शब्दात दिग्विजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला.