चौकीदार पराठ्यासोबत भारतीय नकाशाच्या आकाराची थाळी निवडणुकीच्या पंगतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:51 AM2019-04-17T09:51:23+5:302019-04-17T10:22:02+5:30
दिल्लीतील कनॉट प्लेस येथील एका रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात आलेली 'इलेक्शन स्पेशल थाळी' सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खवय्यांना चौकीदार पराठा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मतदान केल्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मतदारांना ऑफर्स देण्यात येत आहेत. मात्र आता हॉटेलमध्येही निवडणूक स्पेशल वातावरण तयार करण्यात आले आहे. 'इलेक्शन स्पेशल थाळी' ही काही हॉटेलमध्ये खास तयार करण्यात आली आहे.
दिल्लीतील कनॉट प्लेस येथील एका रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात आलेली 'इलेक्शन स्पेशल थाळी' सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खवय्यांना चौकीदार पराठा देण्यात आला आहे. भारताच्या नकाशाच्या आकाराची खास थाळी तयार करण्यात आली असून त्यामध्ये अन्नपदार्थ देण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी तसेच मतदारांना प्रोत्साहन द्यावे हा यामागचा उद्देश असल्याची माहिती रेस्टॉरंटचे मालक सुवीत कालरा यांनी दिली आहे. तसेच देशातील जवळपास 28 राज्यांमधील विविध पदार्थांची चव या थाळीत खवय्यांना चाखायला मिळत आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'इलेक्शन स्पेशल थाळी' ही साडे पाच किलोपासून दहा किलोपर्यंत आहे. यामध्ये जम्मू काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंतच्या सर्व प्रसिद्ध पदार्थांचा समावेश आहे. पंजाबचं बटर पनीर मसाला, बिहारचं लिट्टी चोखा, गुजरातचा ढोकला व खांडवी, वेज शाफले, आलू पोस्तो, हिमाचली छोले, बीसी बेले बाथ, दाल पचरंगी सारख्या अनेक पदार्थांचा समावेश हा शाकाहारी थाळीत आहे. तर मांसाहारी थाळीत पंजाबी चिकन बटर मसाला, हैदराबादची बिर्यानी, कोशा मंगसो, लखनौचं गलौटी कबाब, मटन पेपर फ्राय, चिकन चेट्टीनाद, गोअन फिश करी या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. डेजर्ट्समध्ये ही विविध राज्यातील पदार्थांची चव चाखण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे.
मतदान करा अन् मिळवा मोफत जेवणासह औषधांवर सूट
मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता व्यापारी संघटनाही पुढाकार घेत आहेत. दिल्लीजवळील नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशनने मतदान करणाऱ्यांना औषधांवर 10 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. बोटावरील शाई दाखवल्यानंतर 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. मतदान करणाऱ्यांना औषधांवर 10 टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनूप खन्ना यांनी केली होती. तसेच मतदान करणाऱ्यांना 'दादी की रसोई'कडून मोफत जेवण देण्यात आले होते. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक खासगी रुग्णालयांनीही मतदारांसाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत. मतदान केल्यानंतर मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर काही रुग्णालयांनी रुग्ण तपासणी आणि उपचार खर्चात 10 ते 15 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.