...तर 23 मे नाही, 24 मे रोजी येणार लोकसभेचे निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 10:48 AM2019-03-28T10:48:32+5:302019-03-28T10:48:54+5:30
यंदा मतमोजणीला वेळ लागण्याची दाट शक्यता
नवी दिल्ली: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. राजकीय पक्षांमधील ही लढाई निवडणुकीच्या आखाड्यासोबतच न्यायालयातही लढली जात आहे. त्यामुळेच यंदा लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मेऐवजी 24 मे राजी जाहीर होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. विरोधकांची ही मागणी मान्य झाल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवस उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी होईल. आतापर्यंत ईव्हीएममध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी करुन निकाल जाहीर केला जायचा. यासाठी 4 ते 6 तासांचा अवधी लागायचा. मात्र आता विरोधी पक्षांनी कमीतकमी 50 टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करुन निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. कमीत कमी 50 टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करावी, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याचिकेवर आतापर्यंत झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं घेतलेली भूमिका पाहता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीच्या बाजूनं कौल मिळण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास मतमोजणीसाठी अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे लोकसभेचा निकाल स्पष्ट होण्यासाठी 24 मे उजाडावा लागेल.