खासदार महाशय मोदी सरकारचं गुणगान गात बसले, हेलिकॉप्टर त्यांना न घेताच उडाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 04:51 PM2019-04-29T16:51:50+5:302019-04-29T16:53:59+5:30

येताना आले झोकात, जाताना लागली 'वाट'!

Lok Sabha Election 2019: helicopter leaves BJP MP Rajveer Singh alone | खासदार महाशय मोदी सरकारचं गुणगान गात बसले, हेलिकॉप्टर त्यांना न घेताच उडाले!

खासदार महाशय मोदी सरकारचं गुणगान गात बसले, हेलिकॉप्टर त्यांना न घेताच उडाले!

Next
ठळक मुद्देएक हेलिकॉप्टर धुरळा उडवत निघून गेल्यानं भाजपाच्या खासदार महोदयांची भलतीच पंचाईत झाली. येताना झोकात आलेल्या राजवीर यांचा परतीचा प्रवास खडतर ठरला.कारणीभूत ठरलं, ते त्यांचं लांबलचक भाषण. 

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असल्यानं संध्याकाळी सहानंतर सगळा राजकीय माहौल शांत होईल. पण, निवडणुकीचे अजून तीन टप्पे शिल्लक आहेत आणि त्यात उत्तर प्रदेशचे अनेक मतदारसंघ येतात. स्वाभाविकच, तिथे स्थानिक आणि राष्ट्रीय नेते प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. या धामधुमीतच, एक हेलिकॉप्टर धुरळा उडवत निघून गेल्यानं भाजपाच्या खासदार महोदयांची भलतीच पंचाईत झाली. 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे चिरंजीव राजवीर सिंह हे एटा मतदारसंघाचे खासदार आहेत. कौशांबी जिल्ह्यातल्या एका गावात त्यांची सभा होती. भाजपाचे उमेदवार विनोद सोनकर यांच्या प्रचारासाठी ते खास हेलिकॉप्टरने आले होते. परंतु, येताना झोकात आलेल्या राजवीर यांचा परतीचा प्रवास खडतर ठरला. त्याला कारणीभूत ठरलं, ते त्यांचं लांबलचक भाषण. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाच वर्षांत केलेली कामं, त्यांच्या योजना यावर राजवीर सिंह भरभरून बोलले. मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तरंही दिली. किती बोलू आणि किती नको, असंच जणू त्यांना झालं होतं. या उत्साहात हेलिकॉप्टर अडीच वाजता परतीच्या प्रवासासाठी उडणार, हेही ते विसरले. सवा दोनच्या सुमारास पायलटने त्यांना सूचना दिली. परंतु, 'वाइंड अप'च्या इशाऱ्यानंतरही त्यांचं मोदीगान सुरूच होतं. अखेर, खासदार महोदयांना तिथेच सोडून पायलटनं बरोब्बर अडीच वाजता 'टेक ऑफ' केलं आणि हेलिकॉप्टर लखनऊच्या दिशेनं रवाना झालं. त्यामुळे राजवीर सिंह यांना परतीचा प्रवास कारने करावा लागला.

खासदार असो, मंत्री असो वा त्याहून मोठा नेता; हेलिकॉप्टरची वेळ त्यांना पाळावीच लागते. 'एअर ट्रॅफिक कंट्रोल'च्या दृष्टीने ते महत्त्वाचं असतं. ही वेळ न पाळल्याचाच फटका राजवीर सिंह यांना बसला.

Web Title: Lok Sabha Election 2019: helicopter leaves BJP MP Rajveer Singh alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.