'सत्ता आल्यास सर्वप्रथम सरकारी संस्थांमधील आरएसएसच्या लोकांना हटविणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:47 PM2019-04-25T17:47:17+5:302019-04-25T17:47:31+5:30
सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील अनेक सरकारी संस्थांमध्ये अशा लोकांची भरती केली जे लोक सरकारी कामात दखल देतात. त्यामुळे विविध संस्थांच्या स्वायत्ततेवर परिणाम होतो, असं पित्रोदा यांचे मत आहे.
नवी दिल्ली - गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास देशीतील सरकारी संस्थांमध्ये असलेल्या आरएसएसच्या लोकांची सर्वप्रथम हकालपट्टी करणार असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले आहे. तसेच सरकारी संस्थांमधील स्वच्छता, काँग्रेसचे प्रमुख काम असल्याचे पित्रोदा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील अनेक सरकारी संस्थांमध्ये अशा लोकांची भरती केली जे लोक सरकारी कामात दखल देतात. त्यामुळे विविध संस्थांच्या स्वायत्ततेवर परिणाम होतो, असं मत पित्रोदा यांचे आहे. यावेळी त्यांनी परदेशातील एक उदाहरण दिले. शिकागोमधील भारतीय दुतावासात आरएसएसची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला नियुक्त करण्यात आले आहे. त्या व्यक्तीमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा पित्रोदा यांनी केला.
आरएसएसच्या लोकांना हटविणे काँग्रेसचे पहिलं काम असलं तरी दुसरं काम म्हणजे, काँग्रेसचे घोषणापत्र सर्व मंत्रालयाला पाठविण्याचे आहे. तसेच पक्षाकडून देण्यात आलेले आश्वासने ५०, १०० आणि १५० दिवसांत विविध मंत्रालयाकडून पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पित्रोदा यांना अफ्सापा आणि देशद्रोहाचा कायदा हटविण्यासाठी काँग्रेसला किती दिवस लागतील, अस विचारण्यात आले. यावर पित्रोदा यांनी सावध पावित्रा घेत उत्तर देणे टाळले. तसेच त्यांनी आश्वासने पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र काँग्रेसला किती यश मिळेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.