माफी नाहीच; प्रज्ञासिंह ठाकूरांकडे मोदींनी केलं दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 11:04 AM2019-05-26T11:04:37+5:302019-05-26T11:21:24+5:30
लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदार संघात भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे, बाबरी मस्जिद आणि नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती .
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानाने भाजपला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी मोदींनी मात्र नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे मोदींनी अजूनही ठाकूर यांना माफ केले नसल्याची चर्चा सर्वत्र होती.
लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदार संघात भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे, बाबरी मस्जिद आणि नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती . त्यांनतर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी सुद्धा मागीतीली होती. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी, मी त्यांना मनापासून कधीच माफ करणार नाही, असं त्यावेळी प्रतिक्रिया देतांना मोदी म्हणाले होते. त्याची प्रचिती सेंट्रल हॉलमधील बैठकीत आली.
मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्व खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी साध्वींनी मोदींना अभिवादन केलं. मात्र, मोदींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळं मोदींनी साध्वींना अजूनही माफ केलं नाही, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर रंगली होती.